महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा आता नेम राहिला नाही. शिंदे गटाने राजकीय नाट्य घडवल्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपच्या गळाला लागले आहे. चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, चव्हाणांसाठी थेट दिल्लीतून सूत्र हलली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेच यामागचे सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य होऊन एक महिना होत नाही तोच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका ठिकाणी भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले. दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर भाजपकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केला. सेनेतून बाहेर पडण्याची हालचाल शिंदे आधीपासून सुरू केली होती. तर काँग्रेसच्या बळावर राज्यात सत्ता येणे कठीण असल्याचे चव्हाणांना जाणवू लागले होते. सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या भूमिकेतून भाजपकडे चर्चेसाठी डाव टाकला. हे कळताच दिल्लीतून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबंध होते. आणि दोन्ही नेते मुळ काँग्रेसचेच. त्यामुळे बोलणी करायला आणखी सोपे झाले, असं वृत्त दिव्य मराठीने दिलं आहे.
मध्यंतरी अब्दुल सत्तार यांनी चव्हाणांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चर्चा केली. चव्हाण यांनी काँग्रेसचे किमान 15 आमदार सोबत आणावे अशी भाजपच्या वरिष्ठांची अपेक्षा आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आशिष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्यासोबत तीन नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते. या भेटीमागचं निमित्त गणपतीचं असलं तरी या दरम्यान काय चर्चा झाली असावी यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.