अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अभुतपूर्व असा संघर्ष पाहण्यास मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाने जोरदार प्रयत्न करत आहे. पण, आता शिंदे गट शिवसेनेला मैदानात थेट भिडणार नाही. शिंदे गटाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असला तरी युती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना गट युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि सभा तसंच रोड शोमध्येही सहभागी होणार असं या बैठकीमध्ये ठरलं आहे. शिंदे गटाकडूनही डमी उमेदवार दिला जाणार अशी शक्यता होती. पण, आतापर्यंत झालेला संघर्ष पाहता शिंदे गटाकडून डमी उमेदवार उभं करण्याचा प्रस्ताव आता मागे घेण्यात आला आहे.
वर्षा बंगल्यावरील बैठक संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. भाजपच्या उमेदवाराचा युतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आणि प्रचारही करणार असून रणनितीवरही चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
ऋतुजा लटकेंना सहानुभुती मिळू नये, याची पुरेपूर काळजी भाजप आणि शिंदेंचा पक्ष घेत आहे, त्यामुळेच पटेल यांना ढाल-तलवार या चिन्हावर लढण्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, पण त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला.
भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना झाल्यास ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळेल, असं भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाटत होतं. त्यामुळेच मुरजी पटेलांना शिंदेंच्या पक्षाकडून रिंगणात उतरवून शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत घडवून आणण्याची रणनीती असल्याच्या चर्चा होती.
अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत आता मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांच्यात सामना होणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. 6 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.