महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. मुंबई वेधशाळेनं आज दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे 2, 3 दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं आज म्हणजेच 23 जुलैसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, पालघर आणि ठाणे, यतवमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील उर्वरित सर्व जिल्हे, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभगानं उद्यासाठी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. रविवारसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे राज्याला थोडासा दिलासा मिळू शकतो.
राज्यात आजही पावसाचं धुमशान सुरुचं आहे. कोकण, गोवा, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात विशेषता रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. तर, सांगली, सोलापूर, बीड, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस होऊ शकतो.