अँडरसन – राॕबिन्सनची कमाल,भारताचा डावाने पराभव,इंग्लडची मालिकेत बरोबरी
तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला.मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
राज्यात उद्यापासून चार
दिवस पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तपास यंत्रणांचा केंद्र
सरकारकडून वापर
केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसशी लढण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे कारण ते पक्षाशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी तसंच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. याच मुद्द्यावरुन ममता बोलत होत्या.
४८ तासांमध्ये अमेरिकेने केले इस्लामिक
स्टेटच्या तळांवर बॉम्ब हल्ले
अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे.
बाजारात आला
अँटीव्हायरल मास्क
कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मास्क बनविणाऱ्या कंपन्या याबाबत नानाविध दावे करत असतात. त्यातच आता नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेला अँटीव्हायरल मास्क केवळ कोरोना व्हायरसपासून संरक्षणच करत नाही, तर सात तासांपर्यंत व्हायरसचा नाश करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे चार थरांनी बनवलेला हा मास्क विवेक कोहली एंटरप्रायझेसने फार्म टू फार्म कंपनी इंग्लंडच्या सहकार्याने भारतीय बाजारात आणला आहे. याचे तंत्र यूकेचे शास्त्रज्ञ डॉ. गॅरेथ केव यांनी विकसित केले आहे. त्याला पेटंटही मिळाले.
दिल्लीत १ सप्टेंबरपासून
पुन्हा शाळा भरणार
दिल्लीत १ सप्टेंबरपासून पुन्हा शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या, आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरू लागतील. मात्र, या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. पहिल्या टप्प्यातील शाळा सुरू झाल्यानंतर सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांबाबत विचार केला जाणार आहे.
एकही लस न घेतलेले
लोक डेल्टा व्हेरिएंटने बाधित
कोरोनाला रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या लोकांनी अजूनही ल घेतली नाही, अशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लस न घेतलेल्या बाधितांचा मृत्यूदर चार टक्क्यांच्या वर नोंदविला गेला आहे. एकही लस न घेतलेले लोक डेल्टा व्हेरिएंटने बाधित होऊन नंतर त्यांची प्रकृती वेगाने गंभीर होत असल्याचे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे. एक डोस घेणा-या रुग्णांचा १.३४ टक्के असा मृत्यूदर नोंदविला आहे. लशीचे दोन्ही डोस घेणा-याचा मृत्यूदर शून्य टक्के आहे.
धुळे एसटी महामंडळमधील
चालक कमलेश बेडसेची आत्महत्या
धुळे एसटी महामंडळमधील चालक असलेल्या कमलेश बेडसे (वय ४५) या कर्मचा-याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करतांना बेडसे यांनी सुसाईड नोट लिहली असून त्यात एसटी महामंडळाला जबाबदार भरत धरले आहे. या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी व सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत साक्री डेपो बंद केला. कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी जोपर्यंत एसटी महामंडळावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.
घरात पाण्याची व्यवस्था नाही,
अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली
कौन बनेगा करोडपती १३ होस्ट अमिताभ बच्चन
यांनी याबाबत खुलासा केला की, शूटिंगसाठी ते सकाळी लवकर उठले पण तेव्हाच त्यांना कळले की, घरात पाण्याची समस्या आहे. या संदर्भात बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पोस्ट करत या समस्येचे स्पष्टीकरण केले आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, सकाळी ६ वाजता ते उठले आणि त्यांना कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर जायचे होते. पण तेव्हाच त्यांना कळले की, घरात पाण्याची व्यवस्था नाही, पाणी पुरवठ्यात किंवा नळात बिघाड झाला आहे. त्यामुळे उशीराने यावे लागले त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी मागितली.
संपादक आणि गुणवंत लेखक
आनंद अंतरकर यांचे निधन
हंस ‘ , ‘ मोहिनी ‘ व ‘ नवल ‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार( २८ ऑगस्ट) रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
टेनिस खेळाडू भाविना पटेल
गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर
भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने क्लास 4 टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. तिने उपांत्य फेरीत चिनी पॅडलर झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव केला.
मोदी सरकारचं आर्थिक धोरण
जॉबलेस, प्रवीण तोगडिया
देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींचे एकेकाळचे जीवलग मित्र प्रवीण तोगडिया यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचं आर्थिक धोरण जॉबलेस असल्याची टिप्पणी करत मोदींजींची आर्थिक धोरणं काही कामाची नसल्याची टीका त्यांनी केली.वर्ध्यात कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त करताना आर्थिक मॉडेलवर टीका केली.
राजकारणात काही विषाणुही परत
येत आहेत : आदित्य ठाकरे
राजकारणात वातावरण बदल होत आहे. काही विषाणुही परत येत आहेत, असा टोला लगावताच जे काही घडलं तो विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही जनतेसाठी काम करत राहू, असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईच्या पहिल्या वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे याांनी ही टीका केली.
प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर
असे प्रसंगच आले नसते : अजित पवार
नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावलाय. तसंच प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.
पुण्यातील आर्मी स्टेडियमला
नीरज चोप्राचं नाव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केलं.
बलात्कार प्रकरणावर
तापसी पन्नूची संतप्त प्रतिक्रिया
छत्तीसगड उच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराबाबत वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूने या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता इतकंच ऐकायचं राहिलं होतं असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तापसीने न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट करत आपली भूमिका मांडली.
अंध स्पर्धक हिमानी बुंदेला
ठरली करोडपती
विजेता कोणतेही वेगळे काम करत नाही, तो सर्वकाही वेगळ्या पद्धतीने करतो …” हे आग्रामधील अंध स्पर्धक हिमानी बुंदेला यांचे शब्द होते, ज्यांनी हॉटसीटवर आपला केबीसी प्रवास सुरू केला. हिमानी एक उत्साही शिक्षिका आहे, जी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवते. ती तिच्या विद्यार्थ्यांची सर्वात आवडती शिक्षिका आहे कारण ती मानसिक गणिताला ‘मॅथ्स मॅजिक’ म्हणवून शिकण्याचा अनुभव खास बनवते. तिचा केबीसी प्रवास 30 आणि 31 ऑगस्टला सुरू होत असून, ती अमिताभ बच्चन यांना काही मानसिक गणिताच्या युक्त्या शिकवतानाही दिसेल, अमिताभ यांनी तिचे खूप कौतुक केले.
SD social media
9850 60 3590