भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला आता बहरीनने देखील परवानगी दिली आहे. बहरीनच्या राष्ट्रीय आरोग्य नियामक प्राधिकरणाकडून कोवॅक्सिनच्या वापराला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. बहरीनची राजधानी मनामा स्थित भारतीय दूतवासाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत कोवॅक्सिनच्या वापराला बहरीनसह एकूण 97 देशांनी परवानगी दिली आहे. ज्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, फ्रांस, जर्मनी या सारख्या देशाचा समावेश आहे. यामुळे आता कोवॅक्सिन लसीचे डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना या देशात प्रवेश करणे सोपे झाले आहे.
याबाबत माहिती देताना राष्ट्रीय आरोग्य नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे की, बहरीन सरकारने शुक्रवारपासून भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला देशात परवानगी दिली आहे.कोवॅक्सिन या लसीला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील परवानगी देण्यात आली आहे. कोवॅक्सिन या लसीचा उपयोग 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी करण्यात येऊ शकतो असे डब्लूएचओने म्हटले आहे. कोवॅक्सिन समावेश हा जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी देण्यात आलेल्या लसींमध्ये झाला आहे.
कोवॅक्सिन लसील मंजुरी देण्यापूर्वी या लसीची विविध नागरिकांवर ट्रायल करण्यात आली. या ट्रायलमध्ये तब्बल 26 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये असे आढळून आले की, ही लस कोरोनाविरोधात 77.8 टक्के सुरक्षा प्रदान करते तसेच तिचे कुठलेही इतर साईडइफेक्ट नाहीत. त्यानंतर बहरीनमध्ये या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.