महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसामुळे शंभरावर मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले.
महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.
रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून काल भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.
पावसामुळे महाराष्ट्रात शंभरावर मृत्यू
चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – 13 जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
पोसरे, रत्नागिरी – 17 जणांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू