पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यात चार विद्यार्थ्यांचा, तर पाच महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्याच्या चासकमान आणि भाटघर धरणात या दोन्ही घटना घडल्या आहेत.
रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई अशी चासकमान धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भाटघर धरणात बुडून मृत्यू होणाऱ्यांमध्ये खुशबू संतोष रजपूत (वय १९), मनिषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती राजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी राहणार हडपसर), मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा. नऱ्हे) यांचा समावेश आहे.
रितीन डीडी, नव्या भोसले, परिक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई हे सर्व जण परराज्यातून शिक्षणासाठी आले होते. गुंडाळवाडी परिसरात गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा लक्षात समोर आला. या घटनेनंतर चौघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले.
चासकमान धरणालगतच्या बुरसेवाडी हद्दीत कृष्णामूर्ती फाउंडेशनची सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा आहे. या शाळेला सुटी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विद्यार्थी सायंकाळी साडेचार वाजता चासकमान धरणाजवळ गेले आणि पाण्यात उतरले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार काही विद्यार्थी कमरेइतपत पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आली आणि त्यात सहा ते सात विद्यार्थी लाटेसोबत पाण्यात ओढले गेल्याने बुडाले.
यावेळी शिक्षकांनी त्यातील काही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघे पाण्यात बुडाले. ग्रामस्थांच्या मदतीने चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.