टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले होते. याच आरोपात त्यांना आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांना निलंबित केलं गेलं होतं.
या निलंबनाची बातमी न्यूज18 लोकमतने दाखवल्यानंतर सोशल मीडियात देखील गिरी यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचा चर्चा झाल्या. अनेक राजकीय नेत्यांनीही यात एसटी महामंडळाच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता. अखेर त्यांची चौकशी करून एसटी महामंडळाने हे निलंबन मागे घेतलं आहे.
कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र, हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत 1 ऑक्टोबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर विविध स्तरातून यावर आक्षेप घेण्यात आला. अखेर वाढता दबाव पाहता हे निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
महामंडळाने गुरुवारी आपल्या या निर्णयावर फेरविचार केला आणि यानंतर दोन ओळींचं पत्र लिहित मंगला गिरी आणि कल्याण कुंभार यांचं निलंबन मागे घेत असल्याची माहिती दिली.
टिकटॉक स्टार मंगल सागर गिरी या रिल्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो फॉलोवर्स असून त्या वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकत असत. त्यांच्या या रिल्सला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळत असे. मात्र, हे सगळं महामंडळासाठी बदनामीकारक असल्याचं सांगत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. जे अखेर मागे घेण्यात आलं आहे.