आज दि.२६ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनावर मात करून राजभवनात दाखल झाले आहे. त्यांनीही आता बंडखोर असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे, असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना लिहिले आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  राज्यपालांनी कोरोनावर आता मात केली आहे. उपचाराअंती आता राज्यपाल कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राजभवनात येऊन राज्यपालांनी कामकाज हाती घेतला.

शिवसेनेला आणखी एक धक्का; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले आहे.एएनआयच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत.

मध्य प्रदेशने इतिहास घडवला, मुंबईला हरवून रणजी चॅम्पियन!

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशने इतिहास घडवत मुंबईचा 6 विकेटने पराभव केला आहे. 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने मध्य प्रदेशला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 108 रनचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मध्य प्रदेशने 4 विकेट गमावून पार केलं. मध्य प्रदेशकडून हिमांशू मंत्रीने 37 रन केले, तर शुभम शर्मा 30 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून शम्स मुलानीने तीन आणि धवल कुलकर्णीने 1 विकेट घेतली.

‘बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मिलेट्री आणू दे, माझ्या बापाचं काय जातं?’, जितेंद्र आव्हाड भडकले

राज्यात सत्तेचा सारिपाटीचा खेळ चांगलाच रंगताना दिसतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू आमदार एक-एक करुन गुवाहाटीला जात आहेत. महाविकास आघाडी सरकार डगमगू लागलं आहे. कारण महत्त्वाच्या मंत्र्यांनी सत्ताधारी सरकार विरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचं हे बंड यशस्वी ठरलं तर त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहेत. या सगळ्या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील व्यथित झाले आहेत. त्यांचं हे व्यथित होणं हे आज त्यांच्या वागणुकीतून दिसून आलं आहे. जितेंद्र आव्हाड आज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांचा रोष बघायला मिळाला.आव्हाडांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलणं टाळलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना बंडखोर आमदारांना केंद्राकडून CRPF जवानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला असता ते भडकले. “अरे मिलेट्री आणू दे ना, माझ्या बापाचं काय जातं?”, असं आव्हाड संतापात म्हणाले.

भावाबहिणीची जोडी ठरली सुपरहिट, ‘दादा एक…. नाटकानं दिली मोठी Good News

हृता दुर्गुळे आणि उमेश कामत यांच्या सुपरहिट भावाबहिणीची जोडी असलेलं एक नाटक म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’. या नाटकाने सगळ्या नाट्यरसिकांना वेड लावलं आहे. या नाटकाचा हटके विषय आणि त्याची अप्रतिम मांडणी यामुळे हे नाटक अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या आवडीचं नाटक बनलं. आज या नाटकाकडे सुद्धा खूप मोठी good news आहे.या नाटकाचा आज 250 वा प्रयोग सादर केला जाणार आहे. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा प्रयोग होणार आहे. या नाटकाच्या 250 व्या प्रयोगाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मन्या आणि विनीत या भावाबहिणींमधलं एक गोड आणि निखळ नातं फुलवत नेणारी या नाटकाची कथा अगदी आजच्या तरुणाईला सुद्धा कनेक्ट करणारी आहे. यात हृता दुर्गुळे, उमेश कामत, आरती मोरे, आशुतोष गोखले असे मुख्य कलाकार असून प्रिया बापट या नाटकाची निर्माती आहे. हे नाटकं कल्याणी पाठारे या लेखिकेने लिहिलं असून याच दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केलं आहे.

शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, संतापलेल्या शिवसेना आमदाराचं वक्तव्य

शिवसेनेतील बंडखोर आमदांरांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्ष धोक्यात आला आहे. शिवसेना कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. काल अनेक ठिकाणी संतापलेल्या शिवसैनिकांचा संतापाचा बांध फुटलेला दिसला. बंडखोर आमदारांच्या ऑफिसेसची अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याचं दिसून आलं. आता हिंगोलीतील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना उद्देशून भलताच संताप व्यक्त केलाय. शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, असं वक्तव्य बांगर यांनी केलं. हिंगोलीच्या वसमत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवसेनेच्यावतीने आज शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी हे वक्तव्य केले आहे.

पक्ष वाचवण्यासाठी आता रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीय तीव्रपणे टीका करीत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत शांत असलेले आदित्य ठाकरेदेखील कालपासून एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका करीत आहे. दरम्यान आता रश्मी ठाकरे यादेखील मैदानात उतरल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी ठाकरे या बंडखोर आमदारांच्या पत्नीशी संवाद साधत आहेत. त्यांनी आमदारांची समजूत घालावी आणि परत मुंबई यावं, असं आवाहन करीत आहे. आतापर्यंत त्यांनी 6 ते 8 बंडखोर आमदारांच्या पत्नीशी संपर्क केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काही आमदारांच्या पत्नींनी उलटपक्षी रश्मी ठाकरेंनाच सुनावल्याचं सांगितलं जात आहे. उलटपक्षी आमदारांच्या पत्नीच त्यांच्या पतीवर कसा अन्याय झाला, हे सांगत आहे. त्यामुळे रश्मी ठाकरेंचा हा प्रयत्न फोल ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

‘उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची संधी घेऊन एकनाथ शिंदे पळाले’, राऊतांची बोचरी टीका

राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. या आमदारांच्या फोटोला काळं अनेक ठिकाणी फासण्यात आलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय.’शिवसेनेचा भगवा या बेईमान गद्दारीला जाळून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा राऊत यांनी दिला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवलं. सर्वोच्च न्यायालयानंही त्याची दखल घेतली. तेव्हा राज्यात लाखो लोकं मरावी म्हणजे राष्ट्रपदी राजवट लागेल, असं भाजपाला वाटत होतं. शिवसेनेच्या जळत्या निखाऱ्यात भाजपाला जाळून टाकू, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

पंजाबमध्ये 106 दिवसांमध्ये फिरलं वारं, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ‘आप’ पराभूत

पंजाबमध्ये यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवत सरकार स्थापन केले होते. या निवडणूक निकालानंतर 106 दिवसांमध्येच राज्यात वारं फिरलं आहे. राज्यातील संगरूर लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालाय. संगरूर हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मतदारसंघ होता.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंचे गाव आजही अंधारात, केरोसिनच्या दिव्यात जगतात नातेवाईक

देशातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीत आघाडीवर असलेल्या मुर्मू यांचे गाव आजही अंधारात आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील डुंगरशाही हे मुर्मू यांचे मुळ गाव आहे. या गावात आजही वीज नसून साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी गावकऱ्यांना एक किलोमीटर दूर जावं लागतं.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील ऊपरखेडा गावात झाला. सुमारे 3500 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात बडा शाही आणि डुंगुरशाही या दोन वस्त्या आहेत. बडाशाहीमध्ये वीज आहे पण, ‘आजतक’ नं दिलेल्या वृत्तानुसार सुमारे  डुंगरशाही आजही अंधारात बुडालेलं आहे. या गावातील नागरिकांना केरोसिनच्या प्रकाशात रात्र घालवावी लागते.

ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरी छापा; सापडले करोडो रूपये

बिहारमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात व्हिजिलन्स ब्युरोची कारवाई सुरूच आहे. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मॉनिटरिंग इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने शनिवारी पाटणा आणि गया येथील ड्रग इन्स्पेक्टर जितेंद्र कुमारच्या पाच ठिकाणांवर छापे टाकले. पाळत ठेवणाऱ्या पथकाने जितेंद्र कुमार यांच्या पाटणा येथील सुलतानगंज येथील मलेरिया कार्यालयाची सखोल झडती घेतली. यासोबतच सुल्तानगंज येथील खान मिर्झा निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला. या छाप्यात ड्रग्ज निरीक्षकाच्या घरातून आतापर्यंत सुमारे चार कोटींची रोकड आणि 38.27 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नोटा मोजणी यंत्राद्वारे जप्त केलेल्या पैशांची मोजणी केली जात आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.