अस्वच्छ ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जाणे, खाद्यपदार्थात भेसळ, खराब झालेले पदार्थ वापरणं, पदार्थांत उंदीर-पाल असं काहीतरी सापडणं अशा प्रकरणावर प्रशासनाने कारवाई केल्याचं तुम्हाला माहिती असेल. पण कधी पदार्थाच्या वजनावरून कारवाई झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. समोश्याचं वजन कमी होतं म्हणून दुकान सील करण्यात आलं. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.
कानपूरच्या सेंट्रल स्टेशनवरील ही घटना. रेल्वे प्रशासनाने एका दुकानावर कारवाई केली आहे. रेल्वेची एक टीम प्लॅटफॉर्मवरील वेंडर्सवर लक्ष ठेवून होती. प्लॅटफॉर्म नंबर 5 वरील एक समोश्याचं दुकान टीमने सील केलं, याचं कारण म्हणजे समोश्याचं वजन.
टीमने सांगितलं, समोश्याचं वजन 42 ग्रॅम होतं. समोश्याचं वजन 50 ग्रॅम हवं होतं. समोश्याचं वजन 8 ग्रॅम कमी असल्याने दुकानावर कारवाई केली. दुकान सील करण्यात आलं. हा रिपोर्ट तपास अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला पाठवला.
टी व्ही 9 हिंदी च्या रिपोर्टनुसार विक्रेत्याने याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं की, समोसा तळताना त्यात वापरल्या गेलेल्या मैदातील ओलावा नष्ट होतो ज्यामुळे समोसा हलका होतो. रेल्वेनं विक्रेत्याचं हे कारण मानलं आणि दुकान पुन्हा उघडायला परवानगी दिली. तसंच समोश्याचं वजन 45 ग्रॅमपेक्षा जास्त असावं असे आदेशही दिले.
विक्रेत्यांच्या मनमानीवर IRCTC कडून लगाम; कडक कारवाईचे निर्देश
देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर विक्रेते प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेकडे येत होत्या. रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांची मनमानी रोखण्यासाठी IRCTC कडून कडक सूचना देण्यात आल्या.या सूचनेनुसार रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॅकेटमध्ये विकले जाणारे प्रोडक्ट त्याच एमआरपीवर विकले जाणार. खाद्यपदार्थांचे दरही निश्चित केले जाणार आहेत. मेट्रो सिटी आणि छोट्या शहरातील स्टेशनवर दरात तफावत असली तरी हा दर निश्चित ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विक्रेत्याने त्यांच्या मालाची दर यादी त्यांच्या स्टॉलसमोर लावणे बंधनकारक असेल.
आयआरसीटीसीने सूचना देताना स्पष्ट शब्दात सांगितले, की कोणत्याही विक्रेत्याने प्रवाशांसोबत कोणत्याही प्रकारची मनमानी करू नये आणि जर कोणी विक्रेता असे करताना आढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी.