संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पैठण (Paithan) तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव. कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर आळंदी तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावी म्हणजेच पैठण येथील आपेगावात (Apegaon) माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याची तिथी 2 डिसेंबर रोजी होती. अवघ्या जगाला विज्ञान आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी आपेगावातील भाविकांना विज्ञानाची मोठी अनुभूती आली.
दाटलेल्या ढगांतून चार मिनिटेच उगवला सूर्य
सध्या राज्यभरात पाऊस आणि ढगाळलेले वातावरण असताना फक्त आणि फक्त माऊलींच्या समाधीच्या क्षणांना काही मिनिटेच दाटलेल्या ढगांतून सूर्य उगवला आणि माऊलींच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली. ज्ञानेश्वर माऊलींनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास इंद्रायणी काठी समाधी घेतली होती. तीच वेळ साधत आपेगाव येथील मंदिरातही माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडावीत, यासाठी वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके आणि खगोलशास्त्रज्ञ गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकिरणे आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास करीत आहेत. त्यानुसार तयार केलेल्या यंत्रणेला गुरुवारी समाधीच्या क्षणांना यश येईल की नाही, याबाबत साशंकता होती.
कारण मागील आठवडाभरापासून औरंगाबादसह मराठवाड्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नव्हते. पण संजीवन समाधीच्या वेळी अगदी चार मिनिटे ढगाळलेल्या वातावरणातही सूर्य डोकावला आणि माऊलीच्या मुखकमलावर सूर्यकिरणे पडली. हा किरणोत्सव पाहून माऊलींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही तर तो घडवून आणण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून अथक परिश्रम करणारे वास्तुशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांनाही अश्रू अनावर झाले.