मित्रांनी रंग लावू नये यासाठी गच्चीत लपण्यास गेलेल्या तरुणाचा पडल्याने मृत्यू

मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. 26 वर्षीय सुरज मोरे या तरुणाला प्राण गमवावे लागले. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मात्र मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातील मधल्या आळीत सुरज मोरे हा 26 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी 1 वाजताच्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेले होते.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्याने झालेल्या इमारतीत अविनाश वास्तव्याला असून याच इमारतीखाली हे तिघे बोलत उभे होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना सूरज आणि तुषार दिसल्याने ते त्यांना रंग लावण्यासाठी आले.

यावेळी सूरज आणि तुषार हे दोघेही इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर लपला, तर सूरज हा थेट गच्चीत जाऊन लपला. यावेळी तुषार याला मित्रांनी पकडून खाली आणलं, मात्र त्याला रंग लावत असतानाच अचानक सूरज हा गच्चीतून खाली पडला.

इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात, तिथून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात सूरजला नेलं. मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.