पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे आणि टी20 सीरिजवर राजकीय अस्थिरतेचा परिणाम झाला आहे. दोन्ही देशांमधील 3 वन-डे मॅचची सीरिज 29 मार्चपासून रावळपिंडीमध्ये होणार होती. पण, देशातील अशांत राजकीय वातावरणामुळे तीन मॅचची वन-डे सीरिज आणि त्यानंतरचा एकमेव टी20 सामना आता लाहोरमध्ये होणार आहे. पाकिस्तान सरकारच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास दर्शक ठराव विरोधी पक्षांनी आणला आहे. या प्रस्तावावर पुढच्या आठवड्यात मतदान होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी 27 मार्च रोजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षानं मोठ्या राजकीय सभेचं आयोजन केलं आहे. तर विरोधी पक्षांनी 23 मार्च रोजी रावळपिंडी ते लाहोर दरम्यान मोर्चाचं आयोजन केलं आहे. या दोन राजकीय घटनांचा परिणाम ऑस्ट्रेलियन टीमच्या सुरक्षा व्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे आता वन-डे आणि टी20 सीरिज लाहोरमध्येच होणार आहे. वन-डे सीरिजमधील 3 सामने 29, 31 मार्च आणि 2 एप्रिल रोजी होणार आहे. तर एकमेव टी20 सामना 4 एप्रिल रोजी होईल.
ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी 1998 साली ऑस्ट्रेलियन टीमनं पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी टेस्ट सीरिज 1-0 नं जिंकली होती. तसंच लिमिटेड ओव्हर्सच्या सीरिजमधील सर्व मॅच जिंकल्या होत्या. 2009 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकन टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर कित्येक वर्ष पाकिस्तानचा दौरा करणे आंतरराष्ट्रीय टीमनं टाळले होते. पाकिस्ताननं कित्येक वर्ष त्यांच्या होम सीरिजचं आयोजन यूएईमध्ये केले आहे.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन मॅचची टेस्ट सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. आता या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट 21 मार्चपासून लाहोरमध्ये खेळली जाणार आहे.