आरजेडी अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने दिल्ली एम्सच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालू यादव पाटणा विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. आज त्यांना एम्सच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांना नेमका कसला त्रास झाला आहे, ते स्पष्ट नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालू यादव पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले होते.
पाटण्याहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी लालू यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. नीती आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी नितीश सरकारला चांगलेच घेरले होते. लालू यादव म्हणाले होते की, बिहार शिक्षण ते आरोग्य या क्षेत्रात मागे आहे. नितीश सरकार विकासाचा नारा देत होती, मात्र नीती आयोगाच्या अहवालानंतर त्यांच्या विकासाचे दावे खोटे ठरले आहेत, लालू म्हणाले.
लालू यादव यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नाहीये. प्रकृतीच्या कारणामुळे तुरुंगात असतानाही त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याआधी त्यांच्यावर रिम्समध्ये उपचारही सुरू होते. तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतरही लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतच असतात. अनेक महिन्यांनी ते पाटण्याला गेले होते आणि ते गुरुवारी लगेच दिल्लीला रवाना झाले.