वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
१० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार
करोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
करोनातून बऱ्या झालेल्याना
६ महिन्यांनतर लस देणं धोकादायक
केंद्र सरकारच्या या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात देशातील डॉक्टरांची शिखर संस्था IMA नं आक्षेप घेतला आहे. “करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ६ महिन्यांनतर करोनाची लस देणं हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. या काळात त्यांना पुन्हा या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा पुन्हा विचार करावा”, अशी भूमिका आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयालाल यांनी मांडली आहे. त्यामुळे करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नेमकी लस कधी घ्यावी ? या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे.
पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या
निर्णयाला तूर्तास स्थगिती
पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास ठाकरे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. आरक्षण रद्द झाल्याने नाराज झालेल्या मराठा समाजास या निर्णयाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे बोलले जात आहे.
चक्रीवादळात अडकलेल्या १८४ जणांना
वाचवण्यात नौदलाला यश
तौते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना मोठा तडाखा बसला. वादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ हा तराफ्याचा नांगर वाहवत गेला आणि तराफा भरकटला. त्यानंतर तराफा बुडल्याची माहिती समोर आली होती. तराफ्यावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी सकाळपर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं. तर आता १४ जण मरण पावले असल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाला अरबी समुद्रात १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह मुंबई डॉकयार्ड आणण्यात येत आहेत.
दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे
एकाचा मृत्यू
देशात करोना संकट कमी होत असताना ब्लॅक फंगसची दहशत कायम आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे एकाचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिल्लीतील मूलचंद रुग्णालयात १६ मे रोजी ब्लॅक फंगसचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मूलचंद रुग्णालया व्यतिरिक्त दिल्लीतील आणखी काही रुग्णालयात ब्लॅक फंगसची प्रकरणं समोर आली आहेत. यात सर गंगाराम रुग्णालयात ४०, मॅक्स रुग्णलायत २५, एम्समध्ये १५-२० रुग्ण आहेत.
हा देश तुम्हाला माफ
करणार नाही : रामदेव बाबा
भाजपाच्या अनेक नेत्यांनी हे टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता योगगुरू रामदेवबाबा यांनी देखील टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “माझी हे करणाऱ्या लोकांना विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. काँग्रेसकडून हे ट्वीट बनावट असून त्यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.
अनिल परब यांची मंत्रिमंडळातून
हकालपट्टी करा : सोमय्या
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम केलं. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी”, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्र देखील सादर केली असून त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला. शुक्रवारी रत्नागिरीत पोलीस तक्रार करणार आहे.
उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप
सरनाईकांना वाचवत आहेत का?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) पथकाने तपास केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांना या तपासाबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे काही कारवाई ईडीने केली आहे की सीबीआयने याबाबत संभ्रम होता. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का? असेही ते म्हणाले.
केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत,
त्यांचं मत देशाचं मत नाही
अरविंद केजरीवाल यांनी “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक” असल्याचं ट्वीट केलं होतं. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीच यावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले (सिंगापूरसोबतचे) द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं मत देशाचं मत नाही”, अशा खरमरीत शब्दांत जयशंकर यांनी केजरीवाल यांचं वक्तव्य खोडून काढलं आहे.
वाघिणीच्या हल्ल्यात एका
कर्मचाऱ्याचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील बायोलॉजिकल पार्कमध्ये वाघिणीच्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्याने वाघिणीने ३५ वर्षीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. पौलाश करमाकर असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आसाममधील लखीमपूर जिल्हातील दीकाईजुली येथील रहिवाशी असणाऱ्या पौलाश यांनी वाघिणीच्या पिंजऱ्यातील पाण्याची जागा साफ करण्यासाठी गेला होता. त्यानंतर वाघिणीने हल्ला केल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख राया फ्लॅगो यांनी दिली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना
सीबीआयने केले पक्षकार
नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआयने कोर्टात याचिका दाखल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधी मंत्री मलॉक घटक यांना नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात पक्षकार केलं आहे. तसेच हा खटला राज्याबाहेर वर्ग करण्याची विनंतीही कोर्टाला केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
भाजपाच्या खासदारांनी केलं
तुंबलेलं शौचालय साफ
मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातील करोना केंद्रावरील शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये भाजपाचा खासदार तुंबलेलं शौचालय साफ करताना दिसत आहे. भाजपाचे खासदार जनार्दन मिश्रा हे कुचबिहारमधील करोना केंद्राच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मौगंज येथील करोना केंद्रातील शौचालय अतिशय अस्वच्छ असल्याचं दिसून आलं. त्यानंतर खासदारांनीच थेट हाताता ब्रश घेत हे शौचालय साफ करण्यास सुरुवात केली.
BATA इंडियाच्या मुख्य कार्यकारी
अधिकारीपदी गुंजन शाह
BATA इंडिया (BATA India) अग्रगण्य चप्पल कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे माजी मुख्य व्यावसायिक अधिकारी गुंजन शाह यांची नियुक्ती केलीय. संदीप कटारिया यांच्याऐवजी बाटा कंपनीचे सीईओ म्हणून गुंजन शाह पदभार स्वीकारणार आहेत. तर संदीप कटारिया यांना पदोन्नती देत बाटा ब्रँड्सचे जागतिक सीईओ म्हणून नियुक्त केलंय.
भारतासाठी सौदी
अरेबियाचे निर्बंध कायम
सौदी अरेबियाने भारताला मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाने एकिकडे पाकिस्तानमधील नागरिकांवर प्रवेशबंदीचे निर्बंध कमी केले आहेत, मात्र दुसरीकडे भारतासाठी हेच निर्बंध कायम ठेवलेत. त्यामुळे सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांच्या अडचणी कायम राहणार आहेत. आता पाकिस्तानसह अनेक देशांवरील हे निर्बंध हटवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, भारतीयांच्या प्रवेशावरील निर्बंध कायम आहेत.
आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार
नाही : संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
म्युकर मायकोसिसचा
पुणे जिल्हा ठरला हॉटस्पॉट
कोरोनाच्या संकटाशी झुंज सुरू असतानाच आता म्युकर मायकोसिसने राज्यात थैमान घातले आहे. पुणे जिल्हा तर म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट ठरला असून पुण्यात आतापर्यंत या आजाराने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
दूरदर्शनच्या अँकर कनू प्रिया यांचे निधन
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असून, कोरोनाबाधितांची वाढती संख्याही चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या संकटात अनेक चांगली माणसं आपल्याला सोडून जात असल्याचंही चित्र निर्माण झालंय. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनू प्रिया यांचाही कोरोनानंच घात केल्याचं समोर आलं असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.
SD social media
9850 60 3590