प्रसिद्ध दिवंगत वादग्रस्त फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनावर एका 37 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला 20 वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना मॅराडोनाने तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. माविस अल्वारेझ असे या महिलेचे नाव आहे. तथापि मॅराडोना यांचे गेल्या वर्षी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना आपल्या कारकिर्दीत अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यांच्या मृत्यूनंतरही वादांनी त्यांची पाठ सोडली नाही.
क्यूबाच्या एका महिलेने मॅराडोनावर अंमली पदार्थांचे व्यसन आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित महिला तेव्हा 16 वर्षांची तर मॅराडोना 40 वर्षांचे होते. मॅराडोना त्यावेळी क्यूबामध्ये राहत होते आणि त्यांच्यावर नशामुक्तीसाठी उपचार सुरु होते. त्याच दरम्यान ही घटना घडल्याचे अल्वारेझने नमूद केले. मॅराडोनाने आपल्याला ड्रग्स दिले आणि नंतर लैंगिक अत्याचार केले, असे अल्वारेझने म्हटले आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर अल्वारेझने अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोनावर बलात्कार, हिंसाचार, शिवीगाळ आणि इच्छेविरुद्ध कैद करणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मॅराडोनाला त्याच्या घरीच हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वी मेंदूमध्ये गुठळ्या झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्याच्या मृत्यूवरूनही बराच वाद झाला होता. आता क्युबन महिलेच्या आरोपानंतर मॅराडोना (डिएगो मॅराडोना) याचे नाव पुन्हा वादात सापडले आहे. मॅराडोना, फुटबॉलच्या महान खेळाडूंपैकी एक होते. मॅराडोना ड्रग्जच्या अति आहारी गेले होते. त्यामुळे व्यसनांवर उपचार घेत असताना क्युबामध्ये त्यांनी बरीच वर्षे घालवली.
कथित मानवी तस्करीच्या प्राथमिक तपासाच्या समर्थनार्थ अर्जेंटिनाच्या न्याय व्यवस्थेसमोर साक्ष देण्यासाठी 37 वर्षीय अल्वारेझ गेल्या आठवड्यात ब्युनोस आयर्स येथे आली होती. मॅराडोना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मरण पावला परंतु महिलेचे कायदेशीर प्रतिनिधी माजी फुटबॉलपटूच्या जवळच्या सहाय्यकांना लक्ष्य करत आहेत. यामध्ये त्याचे माजी व्यवस्थापक गुलेर्मो कोपोला आणि अर्जेंटिनातील त्याचा मित्र समाविष्ट आहे जो त्याच्यासोबत 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला क्युबामध्ये राहत होता.