26 नोव्हेंबरच्या निमित्तानं शालेय शिक्षण विभागानं माझे संविधान माझा अभिमान उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम 26 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.
भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्य रुजवणं, विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संविधानातील मूलतत्वांविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, अशा उद्देशातून माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
संविधान दिवस साजरा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तिसरी ते पाचवीच्या वर्गासाठी वक्तृत्व, रांगोळी , चित्रकला सहावी ते आठवीसाठी निबंधलेखन, वक्तृत्व, घोषवाक्ये, स्वरचित काव्यलेखन आणि पोस्टर निर्मिती स्पर्धा, तर नववी ते बारावीच्या वर्गांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व आयोजित कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय संविधानिक मूल्ये, भारतापुढील आव्हाने, संविधान यात्रा, संविधान निर्मितीचा प्रवास, भारतीय राज्यघटेनेचे शिल्पकार, भारतीय संविधान आणि लोकशाही या विषयांवर स्पर्धा आयोजित कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे,सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने “माझे संविधान,माझा अभिमान”उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांत राबवला जाईल.
भारतीय संविधान दिनी राज्यभरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत एकाचवेळी सकाळी 10 वाजता भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले जाईल. यामध्ये शाळा, पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज आदींनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.