Pateti 2022 : पारशी लोक कसा साजरा करतात पतेती सण? नवरोज म्हणजे नेमकं काय?

यंदा पतेती सण सोमवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष सुरू होते. पारशी समाजाच्या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार ‘पतेती’ हा वर्षातील शेवटचा दिवस असतो. पतेतीला पारशी लोक अग्नीची पूजा करतात त्याला अहुरा माजदा म्हटले जाते. या उत्सवात पारशी समाजातील लोक नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मक आचरण करण्याचा संकल्प करतात. पारशी दिनदर्शिकेनुसार भारतामध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ असते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी पारशी समाजाचे नुतन वर्ष सुरू होते. पारशी कॅलेंडरचा पहिला महिना ‘फरवर्दीन’ असतो आणि नववर्षाचा पहिला दिवस नवरोझ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पारशी लोक एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतात.

का साजरा केला जातो पतेती उत्सव?

पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन आहे, तर ‘अवेस्ता’ पारशी धर्मग्रंथ हा आहे. पारशी समाजाच्या मान्यतांनुसार तीन हजार वर्षांपूर्वी राजा साह जमशेद इराणच्या सिंहासनावर विराजमान झाला होता. पारसी समाजातील लोकांनी आनंदाने त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. राजा जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती उत्सव साजरा करू लागले. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पतेती हा नवरोझच्या म्हणजेच नवीन वर्ष सुरु होण्याच्या आधीचा दिवस असतो. पतेतीच्या दिवशी पारशी लोक गेल्या वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देतात. हा दिवस वर्षभरात झालेल्या चुकांचा पश्चाताप करून साजरा केला जातो.

पतेती सण कसा साजरा केला जातो?

पारशी लोक अग्नीला अतिशय पवित्र मानतात. पतेतीला पारशी लोक नवीन कपडे घालून अग्नि मंदिरात पूजास्थळी जातात आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतात. पारशी लोकांमध्ये या दिवशी यज्ञ करण्याची प्रथा आहे. प्रार्थना संपल्यानंतर सर्व लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि एकमेकांना घरी जेवणासाठी बोलवतात. तुम्हाला तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही ‘पारशी नूतनवर्षाभिनंदन’ आणि ‘हॅप्पी नवरोझ’ असं म्हणून त्यांना शुभेच्छा देऊ शकता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

नवरोझ म्हणजे काय?

पारशी नववर्ष हा पारशी समाजासाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. पारशी समाजात पतेती आणि नवरोझ सण साजरा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. काही ठिकाणी नवरोझ साजरा केला जातो तर काही ठिकाणी पतेती सण साजरा केला जातो. या दिवशी जरथुस्त्राचे चित्र, मेणबत्ती, काच, सुगंधित अगरबत्ती, साखर, नाणी अशा पवित्र वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या जातात. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते असी मान्यता पारशी समाजात आहे. हा सण जगभरातील 300 दशलक्षाहून अधिक लोक उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करतात. पारशी लोक वर्षभर या सणाची वर्षाची वाट पाहत असतात. भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं राहतात. हे सर्व लोक दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहान साजरा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.