आज दि.२४ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

काँग्रेसचा स्वबळाचा नारा ,महापालिका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणूकीसाठी एकला चलो रे

महाविकास आघाडीमध्ये घटकपक्ष म्हणून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत.

‘गार्लिक म्हणजे अदरक’,पाकिस्तानच्या मंत्र्याला आलं आणि लसणातला फरक कळेना

लसूण आणि आलं कशाला म्हणतात याबाबत पाकिस्तानच्या मंत्र्यांचा चांगलाच गोंधळ उडालाय. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.लसूण आणि कांद्याचे भाव कमी झाल्याबद्दल मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.फवाद चौधरी हे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. नुकतीच त्यांनी महागाईसंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी लसणाला उर्दूमध्ये नेमकं काय म्हणतात? हे त्यांना आठवत नव्हतं. उपस्थितांनी त्यांना गार्लिक म्हणजे लसूण असं सूचवलं. तरी मंत्री आपल्याच मतावर ठाम होते. त्यांनी गार्लिक म्हणजे अदरक असा उल्लेख केला. यावरून मंत्री फवाद हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.

मुंबई पोलिंसाकडून बनावट ‘ई-बिमा पाॕलिसी’ विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे, ही टोळी अनेक प्रमुख कंपन्यांच्या बनावट विमा पॉलिसी विकण्याचे काम करत होती आणि विम्याच्या नावावर लोकांची फसवणुक केली जात होती.फसवणुक झालेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीनुसार, जून 2020-मार्च 2021 च्या दरम्यान लॉकडाऊन कालावधीत, विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणार्‍या काही व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना जास्त लाभाच्या प्रस्तावांचे आमिष दाखवले.

मुंबईचे फरार पोलिस आयुक्त परामबीरसिंह चंदीगडमध्ये

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता.परमबीर सिंह यांना 17 नोव्हेंबरला फरार घोषित करण्यात आले होते. फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. परंतु त्या अगोदर परमबीर सिंह यांनी चंदीगढ येथे असल्याची माहिती एबीपी माझाला दिली असून लवकरच न्यायालयाच्या आदेशानुसार हजर होणार आहे.

मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली,२१ जण जखमी

तुमसर रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली. ही घटना आज सकाळी १० वाजता वासेरा गावाजवळ घडली. या घटनेत २१ जण गंभीर जखमी झाले.

जखमींमध्ये १९ महिला, चालक व एका ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या सर्वांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या सर्व महिला आज सकाळी नऊ वाजता टाटासुमो (क्रमांक ३६/ ५५ ५२) या वाहनाने पिटेसुरवरून नागपूर जिल्ह्यातील येथील बेडेपार गावात मिरची तोडण्या करता जात होत्या. दरम्यान, आज सकाळी १० वाजता वासेरा गावाजवळ ही सुमो उलटली. यात गाडीचा पार चेंदामेंदा झाला, सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव येथील पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पाठवलं.

एतिहासिक कृषी कायदे अखेर रद्द,कॕबिनेट बैठकित मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत नुकताच हा निर्णय झाला. या निर्णयानंतर मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे आजची बैठक ऐतिहासिक ठरली. आता 29 नोव्हेंबर रोजी हे विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. कृषी मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून हे नवं विधेयक तयार केलं आहे. त्यावर कॅबिनेटमधील मंत्र्यांनी आज मंजुरी दिली.

राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? आरोग्यमंत्री टोपे यांचं मोठं वक्तव्य

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. महाविद्यालयं, पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्यानंतर आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.टोपे म्हणाले की, पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही म्हटलं आहे. उद्या कॅबिनेट आहे, या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ना हरकत दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.