महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरु झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. जवळपास दोन ते अडीच वर्षे ही मॅरेथॉन बैठक सुरु होती. या बैठकीकडे अनेक राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांचं लक्ष होतं. या बैठकीला अनेक कंगोरे आहेत. कारण त्या बैठकीआधी सह्याद्री अतिथीगृहावरही बैठक पार पडली. ही बैठक आटोपून काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या दुसऱ्या बैठकीसाठी गेले. त्यामुळे या घडामोडींना महत्त्वाचं मानलं जात होतं. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर मंथन झालं याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ येथील शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीची समन्वय बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. तसेच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकांचे आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यातच या 14 महापालिकांची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अतीमुसळधार क्षेत्रात म्हणजेच कोकण पट्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यात यावेत असे आदेश असतानाही, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक कार्यक्रम पावसाळ्यातच नियोजित केले आहेत. याच विषयावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘वर्षा’वरील समन्वय बैठकीत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संभाजीराजेंसाठी मराठा संघटना आक्रमक
एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप काही सुटताना दिसत नाहीय. कारण शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी ती अधिकृत घोषणा नाही. शिनसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्याबाबतची घोषणा केली होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून खासदार संभाजीराजेंना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरुवातीला होती. पण शिवसेनेने पाठवलेला प्रस्ताव संभाजीराजेंनी नाकारला. त्यामुळे शिवसेनेच्या कोल्हापुरच्या जिल्हाध्यांना उमेदवारी देण्यात आली, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. पण शिवसेनेच्या या निर्णयामुळे राज्यातील काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छावा संघटनेचे पदाधिकारी तर आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला. तसेच राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट शिवसेनेने ठरवला होता, असा धक्कादायक दावा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी केला.