आज दि.९ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी
मंत्री छगन भुजबळ निर्दोष मुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दिवाळीच्या आधीच ईपीएफओ
व्याजाची रक्कम जमा करणार

कर्माचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओमध्ये पैसे असणाऱ्या अनेकांना त्यांच्या प्रोव्हिडंट फंडावरील रकमेवर व्याज मिळवण्याची प्रतिक्षा आहे. या व्याजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दिवाळीआधीच दिवळी भेट देण्याच्या तयारीत आहे. सणासुदीच्या आधी म्हणजेच दिवाळीच्या आधीच केंद्राकडून ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यावर ८.५ टक्क्यांच्या दराने व्याजाची रक्कम जमा केली जाते.

गणेशोत्सवादरम्यान
मुंबईत जमावबंदी

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबईत १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत असे आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये
पुरातत्व खात्याचे सर्वेक्षण थांबवले

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये एक महत्वाचा निर्णय दिलाय. उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये पुरातत्व खात्याला सर्वेक्षण थांबवण्यास सांगितलं आहे. न्यायालयाने वाराणसी न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिलेला निकालाविरोधात हा निर्णय दिलाय. दिवाणी न्यायालयाने मशीद परिसरामध्ये सर्वेक्षणासाठी पुरातत्व खात्याला परवानगी दिली होती.

फ्युचर ग्रुप मालमत्ता जप्ती आदेशाला
सुप्रीम कोर्टाची स्थगिती

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे फ्युचर ग्रुपला दिलासा मिळाला आहे. फ्युचर कूपन्स, फ्युचर रिटेल आणि फ्युचर ग्रुपचे प्रोमोटर किशोर बियाणी यांच्या मालकिच्या संपत्ती जप्त करण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने मार्चमध्ये मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने एनसीएलटी, सेबी आणि सीसीआयला चार आठवड्यापर्यंत या प्रकरणाशी निगडीत कोणताही अंतिम आदेश देऊ नये असं सांगितलं आहे.

अनिल देशमुख यांची
इडीच्या विरोधात याचिका

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. मात्र आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.

सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण
१८ डिसेंबरला प्रक्षेपित केली जाणार

अवकाशात दुरवर बघण्याची आणि विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडून दाखवण्याची अफाट क्षमता असलेली सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या प्रेक्षपणाची, अवकाशात पाठवण्याची तारीख अखेर नासाने जाहीर केली आहे. येत्या १८ डिसेंबरला सुमारे ६.५ टन वजनाची अवकाश दुर्बिण दक्षिण अमेरिकेतील फ्रान्स देशाच्या फ्रेंच गयाना या तळावरुन युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन -५ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे, नारायण राणे
एकाच मंचावर येणार

येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

धोनीच्या निवडीने वादाची
ठिणगी पडू नये : गावस्कर

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टी-२० वर्ल्ड कपसाठी धोनीची नियुक्ती भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी डावपेच आखण्यावरुन रवी शास्त्री आणि धोनीमध्ये वादाची ठिणगी पडू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. दोघांनीही एकत्रपणे काम केलं तर संघासाठी उपयुक्त ठरेल असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियात
MS धोनीचं कमबॅक

धोनीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देताना आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीज भारताला मिळवून दिल्यात. अगोदर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या धोनीने भारताच्या 74 व्या स्वातंत्रदिनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने काल रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये 15 सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल.

खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार
केल्याचं स्पष्ट, ईडी कोर्टाचे निरीक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडी कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहिलं तर एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.