पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. तिथे होत असलेल्या क्वाड देशांच्या बैठकीला ते उपस्थित आहेत. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचा हा ग्रुप आहे. क्वाडची ही दुसरीच प्रत्यक्ष बैठक होत आहे. या सत्रामध्ये चार देशांच्या प्रमुखांमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहेत. दरम्यान, या सर्व देशांच्या प्रमुखांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काय खास आहे या फोटोमध्ये, ते जाणून घेऊया.
या फोटोमध्ये सर्व देशांचे प्रमुख पायऱ्या उतरत खाली येत आहेत असं दिसतंय. यात सर्वात पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी , त्यांच्यासोबत जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा , त्यांच्या मागे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस येत आहेत. यासोबतच मोदींच्या मागे बऱ्याच देशांचे विविध पदाधिकारीही आहेत. सर्वात पुढे पंतप्रधान मोदी ताठ मानेने चालत असल्याचं या फोटोत दिसतंय. त्यामुळे मोदींना ‘ग्लोबल लीडर’ असं संबोधून हा फोटो व्हायरल होत आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं ट्विट
भाजपचे अमित मालवीय यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. ‘लीडिंग दि वर्ल्ड.. ए पिक्चर इज वर्थ ए थाउजंड वर्ड्स’ अशा कॅप्शनसह त्यांनी हा फोटो ट्विट केला. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीदेखील ‘विश्व गुरू भारत’ अशी कॅप्शन देऊन हा फोटो ट्विट केला. स्मृती इराणी यांनी ‘प्रधान सेवक – नोज दी वे, गोज दी वे, शोज दी वे’ अशा कॅप्शनसह हा पंतप्रधानांचा फोटो ट्विट केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्लोबल लीडर’ म्हटलं आहे.
पंतप्रधान पहिल्यापासूनच ग्लोबल लीडर
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लीडर आहेत यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्मने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग मिळालं होतं. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींना यात 71 टक्के मतं मिळाली होती. तर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांना केवळ 43 टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
एकंदरीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लीडर असून, ते जगातल्या बलाढ्य अशा देशांच्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत, हेच सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमधून दिसून येतंय.