माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझे याची तयारी आहे. तसे त्यांने ईडीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात वाझे यांने ईडीकडे अर्ज सादर केला आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. तसे पत्रच वाझे याने ईडीला लिहिले आहे. आता ईडी यासाठी PMLA न्यायालयाची परवानगी घेईल. त्यानंतर वाझे याची साक्ष नोंदवली जाईल. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर इतरही अनेक नावे पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 21 एप्रिल, 2021 रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांने म्हटले आहे, या संदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो. हे पत्र वाझे याने EDचे सहाय्यक संचालक तसीन सुल्तान यांना लिहिले आहे. या प्रकरणाबाबत आता ‘ED चे अधिकारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या परवानगीने वाझे यांचा जबाब महादंडाधिकाऱ्यापुढे सीआरपीसी कलम 164 अंतर्गत नोंदवू शकतात़
वाझे याने बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये 4 कोटी 70 लाख रुपये जमा केल्याचा आरोप आह़े. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदे याला जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझे याने केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर 4 कोटी 18 लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली 4 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ED चा संशय आहे. तसा दावा ED ने केला आहे. तसेच 100 कोटी वसुलीचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.