राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतवासीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! हा भारतीयत्वाच्या अभिमानाचा उत्सव आहे, जो आपल्या सर्वांना एकत्र बांधतो. प्रजासत्ताक दिनाचा हा दिवस त्या महान वीरांच्या स्मरणाचाही एक प्रसंग आहे, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवले आणि त्यासाठी लढण्यासाठी देशवासीयांचा उत्साह जागवला. दोन दिवसांपूर्वी 23 जानेवारी रोजी , आपण सर्व देशवासियांनी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण केले. स्वातंत्र्यासाठीचे त्यांचे कार्य आणि भारताला गौरवशाली बनवण्यासाठीची त्यांची महत्वकांक्षा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
‘कोरोना नियमांचे पालन करणे हे सर्वांची जबाबदारी’
दरम्यान पुढे बोलताना कोविंद यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले आहे. देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. मात्र आता आपल्याला या जागतिक महामारीवर मात करायची आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली पाहीजे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहान देखील यावेळी राष्ट्रपतींनी केले.
देशभक्तीची भावना कर्तव्याला बळकटी देते
याचबरोबर भारताने जगातील टॉप 50 ‘इनोव्हेटिव्ह इकॉनॉमी’मध्ये स्थान मिळवल्याचा उल्लेख देखील यावेळी कोविंद यांनी केला आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधारत आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. मात्र आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. यंदा आर्थव्यवस्थेत अधिक ग्रोथ अपेक्षीत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. पुढे बोलताना कोविंद म्हणाले की, देशभक्तीची भावना ही नागरिकांच्या कर्तव्याला अधिक बळकट करते. तुम्ही कोणीही असुद्यात, डॉक्टर, इंजीनिअर, दुकानदार, कामगार, मजूर, वकील असे कोणीही असाल तुमचे कर्तव्य निष्ठेने व कार्यक्षमतेने पार पाडणे हे राष्ट्रासाठी तुमचे प्राथमिक आणि महत्त्वाचे योगदान असल्याचे कोविंद यांनी म्हटले आहे.