घरामध्ये सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार योग्य असतील, तर सुख-समृद्धी येण्यास वेळ लागत नाही असं म्हणात; मात्र कित्येक वेळा नकळतपणे काही चुकीच्या गोष्टींमुळे अनेकांचं नुकसान होत असतं. वास्तुशास्त्रानुसार वागताना कित्येक जण केवळ हॉल आणि बेडरूम किंवा फार फारतर किचनचा विचार करतात; मात्र घरातल्या इतर जागांप्रमाणेच बाथरूमही तेवढंच महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये आर्थिक प्रगतीचं एक सिक्रेट दडलेलं असते. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रिकामी बादली करते तिजोरी रिकामी
बऱ्याच जणांना माहिती नसेल, मात्र बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. कित्येक वास्तुशास्त्रतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नये. हा अगदी अशुभ संकेत असतो. यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. म्हणजेच, बाथरूममध्ये ठेवलेली रिकामी बादली तुमची तिजोरी रिकामी करू शकते. त्यामुळेच घरात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी बाथरूममधली बादली नेहमी भरलेली ठेवण्याचा सल्ला वास्तुतज्ज्ञ देतात.
कोणत्या रंगाची बादली हवी
वास्तुतज्ज्ञ रोझी जसरोटिया सांगतात, की वास्तुशास्त्रामध्ये रंगांनाही भरपूर महत्त्व आहे. निळा रंग हा वास्तुशास्त्रानुसार शुभ मानला जातो. सुख-समृद्धीचं प्रतीक म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली असणं गरजेचं आहे.
“वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली असणं शुभ मानलं जातं. ही बादली कधीही रिकामी असू नये. तसंच, यामध्ये कधीही खराब किंवा साबणाचं पाणी असू नये. स्वच्छ पाण्याने भरलेली निळी बादली बाथरूममध्ये असल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. तसंच यामुळे कुटुंबीयांमध्ये प्रेमही वाढतं,” असं रोझी जसरोटिया यांनी सांगितलं.
इतर तज्ज्ञांचं मत
काही वास्तुतज्ज्ञांच्या मते ज्यांना शनी आणि राहू दशा आहे, अशा व्यक्तींनी बाथरूममध्ये निळी बादली आणि निळा मग ठेवावा. यामुळे राहू आणि शनीच्या प्रकोपापासून काही प्रमाणात दिलासा मिळतो. तसंच, तुम्हाला आर्थिक प्रगती आणि पत हवी असेल तर बाथरूममध्ये निळ्या रंगाच्या टाइल्स असणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे आपल्या बाथरूममध्ये आणि आपल्या सवयींमध्ये थोडेसे बदल करून तुम्ही आयुष्यात सुख-समृद्धी आणि प्रेम मिळवू शकता.