जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा आणि अवंतपोरा या दोन ठिकाणी जोरदार चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवंतीपोरा भागात तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे आणि दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा समावेश आहे. सुत्रांच्या मते तो एफटी सोबत जवानांच्या शिबिरावर हल्ला करण्यासाठी जात होता. पोलिसांनी या चकमकीनंतर एक एके-74 रायफल, एक एके-56, एक पिस्तुल आदी शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.
लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा सीआरपीएफचे एएसआय आणि दोन आरपीएफ जवानांच्या हत्येसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
या अगोदर सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरच्या जुमागुंड भागात जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला होता. पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी कुरापती सुरूच आहेत.