पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. पण, किडनी रॅकेटमध्ये आणखी तीन रुग्णालयाची नावे समोर आली आहे. पुणे, ठाणे आणि कोईम्बंतूर येथील रुग्णलायांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. किडनी रॅकेट प्रकरणात नव्याने आणखी तीन रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. पुण्यातील वानवडी येथील इमानदार, ठाण्यातील ज्युपिटर, व कोईम्बंतूर येथील के.एम.सी.एच ही तीन रुग्णालये असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रुग्णालयात देखील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे एजंटच्या मार्फत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. तशाच प्रकारे या तीन रुग्णलयात देखील किडनी प्रत्यारोपण झाल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितलं.
किडनी तस्करीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत असताना आता हा तपास कोरेगाव पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या एजंटांना अटक केली आहे.
दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांच्या किडन्या दिलेल्या असल्याचं उघड झालंय. इतकच नाही तर आणखी दोघांना खोटे नातेवाईक दाखवून किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुबी हॉस्पिटलमधून उघड झालेल्या किडनी रॅकेटमध्ये एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे या दोघांना अटक केली. त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर येथील एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपूर येथील एकास किडनी मिळवून दिली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
गुन्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आलं आहे.