आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सना पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे लखनऊचं आयपीएलमधलं प्ले-ऑफमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आरसीबीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 193 रनपर्यंतच मजल मारता आली. केएल राहुलने 58 बॉलमध्ये 79 रन केले, तर दीपक हुड्डाने 26 बॉलमध्ये 45 रन केले. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर रजत पाटीदारच्या शतकामुळे आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 207 रन केले. रजत पाटीदारने 49 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं. पाटीदार 54 बॉलमध्ये 112 रनवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. पाटीदारला दिनेश कार्तिकनेही चांगली साथ दिली. कार्तिकने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 37 रन केले. पाटीदार आणि कार्तिक यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 91 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे लखनऊला विजयासाठी 208 रनचं आव्हान मिळालं.
लखनऊकडून मोहसीन खान, कृणाल पांड्या, आवेश खान आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
आरसीबी फायनल जवळ
लखनऊच्या या पराभवामुळे त्यांचं आयपीएलमधलं आव्हान इकडेच संपुष्टात आलं आहे, तर दुसरीकडे आरसीबीला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक मॅच खेळावी लागणार आहे. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी क्वालिफायरची दुसरी मॅच होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम रविवारी फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.