कठोर लॉकडाउनच्या
पर्यायावर चर्चा
अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे. यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाउन लावणार का? अशी विचारणा होत आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाउनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत.
पश्चिम बंगाल मध्ये केंद्रीय
परराष्ट्र मंत्र्यावर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये काही मृत्यू देखील झाल्याची माहिती आली असून त्या पार्श्वभूमीवर आता या हिंसाराचाराच्या घटनांवरून भाजपाकडून ममतादीदींना लक्ष्य केलं जात आहे. आज खुद्द केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोकं त्यांच्या ताफ्यावर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचं देखील व्ही. मुरलीधरन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पुण्यासारख्या ठिकाणी कठोर
निर्बंध घाला हायकोर्टाची सूचना
पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लॉकडाउन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने यावेळी म्हटलं. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई हायकोर्ट घेत असून सुनावणीदरम्यान ही सूचना करण्यात आली.
तिसरी लाट सप्टेंबरच्या
शेवटी येण्याची शक्यता
राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं आहे.
क्षत्रिय समाजातील गरिबांना
वेगळे आरक्षण द्यावे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने सामने आलेले असतानाच आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यात उडी घेतली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी एक नामी उपायही सांगितला आहे. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12 टक्के आरक्षण द्यावे अशी माझी मागणी असून त्याबाबतचे विनंती पत्र आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहोत.
राज्यात आठवडाभर
ढगाळ वातावरण
कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे.
तर दुसरीकडे या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकची दुर्घटना
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्देवी मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
लता करे यांच्या
पतीचे निधन
बारामती येथील 72 वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे ( 5 मे ) कोरोनाने निधन झाले. लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झाले.
आसाम, केरळमध्ये काँग्रेसची कामगिरी
निराशाजनक : कपिल सिब्बल
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस एकही जागा मिळवू न शकल्याने त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. आसाम आणि केरळमध्येही पक्षाची कामगिरी निराशाजनक असल्याचं त्यांनी सांगितलं. पुद्दुचेरीसुद्धा काँग्रेसच्या हातून गेल्यानं त्यानं पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्ची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्वात जुना राजकीय पक्ष
काँग्रेसचे अस्तित्त्व धोक्यात
पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पराभवाचा पाढा गिरवताना दिसला. त्यामुळे आता देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अस्तित्त्व धोक्यात आल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या काही वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत होताना दिसत आहे. गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास सहा राज्यांमध्ये विरोधी पक्षाची जागाही गमावली आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसपेक्षा अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत.
विदेशातील खेळाडूंना
विशेष विमानाने पाठविले
करोना संकटामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आयपीएल स्थगित झाल्याने खेळाडू घऱी जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे.
SD social media
9850 60 3590