गेल्या दीड महिन्यांपासून भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो जण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाबाधितांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. त्यात आयपीएलचं (IPL 2021) आयोजन भारतात करणं हे जोखमीचं समजलं जात होतं. अशा परिस्थितीत आयपीएल भारतात खेळवणं हे धोकादायक ठरु शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. अखेर ज्याचीच भिती होती तेच झालं. एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करावा लागला. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी दोन आठवड्यापूर्वीच आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, असं सांगितलं होतं. आयपीएल स्थगित करावी लागली, हे असं होणारचं होतं”, असं शोएब म्हणाला.
ट्विटरवर शोएब अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आयपीएल स्थगितीबद्दलचं आपलं मत मांडलं आहे. ज्यात “मी दोन आठवड्यांपूर्वीच बीसीसीआयला सागितलं होतं की आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होणारच होती, बीसीसीआयने त्याची घोषणा केलीय, बीसीसीआयने अतिशय योग्य निर्णय घेतला”, असं शोएब अख्तर म्हणाला.
शोएब अख्तरने व्हिडीओत काय म्हटलंय…?
भारतात कोरोनाची अतिशय वाईट परिस्थिती आहे. दरदिवशी 3 ते 4 लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आहे तर हजारो जणांना कोरोनामुळे आपल्या जीवाला मुकावं लागत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल रद्द होणं गरजेची होती. बीसीसीआयने आयपीएल स्थगित करुन योग्य निर्णय घेतला.
शोएब अख्तरने अगोदर काय सल्ला दिला होता…?
भारत सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. कठोर नियमांचं पालन होत नसेल तर आयपीएल स्पर्धेचा पुनर्विचार व्हावा. पाकिस्ताननेही पीएसएल स्पर्धा पुढे ढकलली आहे, असं शोएब अख्तर म्हणाला होता.
“भारतासाठी सध्याचा काळ हा मुश्कील काळ आहे. इथे दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे तर कित्येक जणांना औषधोपचार न मिळाल्याने जीवाला मुकत आहेत. मी अशा सर्व भारतीयांसाठी अल्लाहकडे दुवा मागतो. या सर्व परिस्थितीशी झुंजण्यास भारतीयांना बळ मिळो”, अशी दुवा शोएबने केली होती.