अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका साकारणार

येत्या 26 जुलै पासून स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडण्यात येणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत.

या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत समजलं जातं. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा… या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा. असं मत स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केलं आहे.

या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. स्टार प्रवाह सध्याची नंबर वन वाहिनी आहे. याआधी प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे.’ तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ 26 जुलैपासून रात्री 10 वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.