कलावंत कोणताही असो, त्याच्यावर दु:खाचा कितीही डोंगर कोसळला तरी त्याला प्रेक्षकांना सामोरे जावंच लागतं. ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वाला जागून त्यांना कार्यक्रम करावेच लागतात. शाहीर डी. आर. इंगळेही त्याला अपवाद ठरले नाही. त्यांच्याही आयुष्यात असाच किस्सा घडला. त्याला ते धीराने सामोरेही गेले. काय होता हा किस्सा?
1972-73चा प्रसंग असेल. शाहीर डी. आर. इंगळे यांचा नांदेडला कार्यक्रम होता. भीम जयंतीमुळे 14 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत त्यांचे मराठवाड्यातील कार्यक्रम बुक होते. मराठवाड्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व मामा येवले यांनी हे कार्यक्रम घडवून आणले होते. त्यांच्याकडेच शाहीर आणि त्यांची वादक मंडळी उतरले होते. त्याचवेळी मामांच्या घरी शाहिरांच्या नावाने तार आली. त्याकाळी तार येणं म्हणजे हमखास दु:खाची बातमी येणं हे समीकरण होतं. झालंही तसंच. या तारेत शाहिरांचा एक वर्षाचा मुलगा मरण पावल्याचं लिहिलं होतं. पण घरी जाणार कसं? कार्यक्रम तर फिक्स होते. बिदागीही घेतली होती. त्यामुळे कार्यक्रम रद्द करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे शाहिरांच्या सहकाऱ्यांनी मुलगा वारल्याची बातमी शाहिरांपासून लपवून ठेवली.
15 दिवस सर्व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी भीत भीतच शाहिरांना ही तार दाखवली. तार वाचून शाहीर क्षणभर स्तब्ध झाले. डोळ्यासमोर निरागस मुलगा आणि अख्खं कुटुंब उभं राहिलं. शाहीर रडत नव्हते, पण मनातून कोलमडून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही स्पष्ट सांगत होते. शाहिरांनी मन घट्ट केलं. उशिरा तार सांगितल्याबद्दल त्यांनी सहकाऱ्यांना ब्र शब्दानेही दुखावले नाही. कारण त्यांच्या समोर होता गाडगेबाबांचा आदर्श. गाडगेबाबांचा मुलगा गेल्यावर त्यांना किर्तन सुरू असताना मुलगा गेल्याची वार्ता सांगण्यात आली. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,
इथे मेले कोटी कोटी,
काय रडू मी एकासाठी…
गाडगेबाबांचं हे सत्यवचन शाहिरांना आठवलं. त्यांनी मनाला सावरलं आणि त्याच अवस्थेत सामानाची बांधाबांध करून गावाकडचा रस्ता धरला. एव्हाना संपूर्ण गावाला शाहिरांचा मुलगा गेल्याची वार्ता कळली होती. त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी अख्खा गाव एसटी स्टँडवर लोटला होता. गावकऱ्यांनाही हुंदके आवरत नव्हते. आज हा प्रसंग आठवल्यावर शाहिरांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आजही त्यांच्या मनाची घालमेल होत असल्याचं दिसून येतं.
भीमराज की बेटी सर्वप्रथम गायलं
उमर मे बाली भोली भाली,
शील की झोली हूँ,
भीमराज की बेटी मै तो,
जयभीमवाली हूँ…
प्रतापसिंग बोदडे यांचं हे सर्वात लोकप्रिय गाणं. गायिका शकुंतला जाधव यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. गाणं लोकप्रियही झालं. त्यानंतर गायिका निशा भगत यांनीही हे गाणं लोकप्रिय केलं. मात्र, हे गाणं सर्वात आधी डी. आर. इंगळे यांनी गायलं होतं. हे गाणं शकुंतला जाधव यांच्या आवाजात रेकॉर्ड होण्यापूर्वी खामगाव येथे एका कार्यक्रमात इंगळे यांनी सर्वप्रथम गायलं होतं.