न्यूझीलंडला पाकिस्तान रोखणार?; आज उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात कर्णधारांच्या कामगिरीवर नजर

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जाणारा न्यूझीलंडचा संघ कागदावर बलाढय़ दिसत असला, तरी बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत त्यांना अनपेक्षित निकाल नोंदवण्यात सक्षम असलेल्या पाकिस्तानचे आव्हान परतवून लावण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील प्रवास पूर्णपणे भिन्न राहिलेला आहे. न्यूझीलंडने ‘अव्वल १२’ फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आर्यलड या संघांचा पराभव करत ‘गट-१’मध्ये अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघाला भारत आणि तुलनेने दुबळय़ा झिम्बाब्वेविरुद्ध हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश अत्यंत अवघड झाला होता. मात्र त्यांनी नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका यांच्यावर विजय मिळवत आपले आव्हान शाबूत ठेवले. त्यानंतर ‘अव्वल १२’ फेरीत अखेरच्या दिवशी नेदरलँड्सने आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला, मग पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम चार संघांत स्थान मिळवले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ लयीत असून त्यांचा न्यूझीलंडची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न असेल. विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य फेरीत तीन वेळा पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आले असून तिन्ही वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे.

बाबरला लय सापडणार?

कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीला ट्वेन्टी-२० विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बाबरने या स्पर्धेच्या पाच सामन्यांत केवळ ३९ धावा केल्या आहेत. मात्र पाकिस्तानला विजय मिळवायचा असल्यास बाबरला लय सापडणे गरजेचे आहे. मधल्या फळीत डावखुरा शान मसून, इफ्तिकार अहमद आणि युवा मोहम्मद हॅरिस यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांच्याकडून पाकिस्तानला अष्टपैलू कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीची भिस्त शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाहवर असेल.

विल्यम्सनकडून अपेक्षा  

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला या स्पर्धेच्या सुरुवातीला धावांसाठी झगडावे लागत होते. मात्र ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांत विल्यम्सनने अनुक्रमे ४० (इंग्लंडविरुद्ध) आणि ६१ (आर्यलडविरुद्ध) धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सूर गवसला आहे. तसेच ग्लेन फिलिप्सचे योगदानही न्यूझीलंडसाठी निर्णायक ठरते आहे. त्याने या स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतक साकारले आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि फिन अ‍ॅलन यांनी आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी डॅरेल मिचेल आणि जिमी निशमवर असेल. मिचेल सँटनर आणि इश सोधी हे गुणवान फिरकीपटू, तसेच ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि लॉकी फग्र्युसन असे दर्जेदार वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या संघात आहेत.

  • वेळ : दु. १.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.