स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये जी-२० समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अभिमानाची आणि प्रचंड संधी उपलब्ध करून देणारी बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना (थिम) आणि संकेतस्थळाचे अनावरण झाले.
‘स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात सर्व सरकारे आणि नागरिकांचे आपापल्या परीने योगदान राहिले आहे. जेव्हा लोकशाही ही संस्कृती होते, तेव्हा संघर्षांला विराम देता येऊ शकतो, हे भारत जगाला दाखवून देऊ शकतो,’ असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळ यातून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. जी-२० अध्यक्षपद भारताकडे येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
जी-२० बद्दल..
जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.