प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाबाबत आता महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश मांजरेकर यांच्यावर त्यांच्या नवीन मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप आहे. निर्मात्याविरोधात ही तक्रार क्षत्रिय मराठा सेवेने केली आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकर यांच्याविरोधातही वांद्रेतील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
यादरम्यान, आयपीसीच्या कलम 292 (अश्लील सामग्रीची विक्री इ.), 295 (अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा), 34 अंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी महेश मांजरेकर यांच्याशिवाय नरेंद्र, श्रेयांश हिरावत आणि ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचे निर्माते एनएच स्टुडिओज यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
वकील डी.व्ही सरोज यांनी या तक्रारीत म्हटले आहे की,‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट 14 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात महिला आणि लहान मुलांना अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रारकर्त्याने दावा केला आहे की चित्रपटातील आशयामुळे समाजात असंतोष निर्माण झाला होता, परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने झाली. या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर यांनी काम केले आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला तेव्हाही या चित्रपटातील बोल्ड आणि आक्षेपार्ह दृश्ये सेन्सॉर करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे करण्यात आली होती. महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लहानग्यांना अशी दृश्य दाखवणे अत्यंत निषेधार्ह आहे. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली आहे. तसंच हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा, अशी मागणीही महिला आयोगाने केली आहे. आता या तक्रारीने मांजरेकरांसह निर्मात्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.