राष्ट्रपती निवडणुकीनंतर ममतांच्या TMC ची नवी खेळी, मिशन 2024 च्या विरोधकांच्या रणनितीला सुरूंग?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. तिसऱ्या राऊंडनंतर मुर्मू यांनी 50 टक्के मतांचा कोटा पूर्ण केला, ज्यामुळे आता त्यांचा विजय निश्चित झाला. द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये विरोधकांची थोडीफार एकजूट दिसली होती, त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र मैदानात उतरू शकतात का? याची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिलं जात होतं, पण आता याला मोठा धक्का बसला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचं टीएमसीने जाहीर केलं आहे. टीएमसीच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटतेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या या निर्णयाची माहिती नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिली आहे.

एनडीएने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधकांकडून राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

‘एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण राज्यपाल असताना धनखड यांनी सरकारसोबत समन्वय ठेवला नाही. तर अल्वा यांच्या नावाची चर्चा न करताच घोषणा करण्यात आली. पक्षाच्या खासदारांची आज बैठक झाली, यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असं टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितलं.

‘तृणमूल काँग्रेसला विश्वासात न घेता विरोधकांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेशी आम्ही सहमत नाही. आमच्यासोबत कोणीही चर्चा केली नाही किंवा आमचा सल्लाही घेण्यात आला नाही, त्यामुळे आम्ही विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही,’ असं बॅनर्जी म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीत टीएमसी सक्रीय

टीएमसीने विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यावर आम्ही संसदीय दलाच्या बैठकीत निर्णय घेऊ, असं टीएमसीकडून सांगण्यात आलं. आता त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे.

याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसी सक्रीय होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठकही घेतली, पण या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. नंतर टीएमसीने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.