थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे हार्ट अटॕक येऊन किंवा शेकोटी पेटवताना झालेल्या चुका यामुळे मृत्यू झाल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. त्यात आता राज्यात कोल्ड वेव्हचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे थंडी इतक्या प्रमाणात वाढेल की ती मृत्यूसाठीही कारणीभूत ठरेल. त्यामुळे या अशा जीवघेण्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करायचं पाहुयात.
थंडीत आपण काही गोष्टी करणं टाळतो, तर थंडीपासून बचाव करण्यासाठी काही उपाय करतो. पण काही वेळा हेच आपल्या जीवावर बेतू शकतं. त्यात शीतलहर येणार त्यामुळे तुम्ही अधिकच सावध राहायला हवं. थंडीत काय करायला हवं आणि काय नाही याची सविस्तर माहिती तुमच्यासाठी,..
थंडीत हायड्रेटेड राहा
थंडीत जास्त तहान लागत नाही, त्यामुळे कमी पाणी प्यायले जाते. तुमच्याबाबतीतही असंच घडत असेल. मात्र हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. खूप फळं खा.
आहारात या पदार्थांचा समावेश करा.
थंडीत शरीराला गरम, उबदार ठेवणारे पदार्थ खावेत. तीळ, गूळ आणि ड्रायफ्रुटसचे सेवन करावं. चहामध्ये आलं, दालचिनी आणि काळी मिरी वापरावी. याने चहाची चव वाढेलच पण इतर अनेक फायदे मिळतील.
बंद खोलीत शेकोटी पेटवू नका
थंडीत बरेच जण उबेसाठी शेकोटी पेटवतात. पण शक्यतो ती बंद खोलीत पेटवू नका. यामुळे धूर घरात कोंडून श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची काही प्रकरणं घडली आहेत.
ॲक्टिव्ह राहा.
थंडीत बरेच जण व्यायाम करणं टाळतात आणि घरातच बसून राहतात. पण एकाच जागी बसल्याने आणखी थंडी वाजते. चालत-फिरत राहिल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. मात्र खूपही फिरू नये. थकवा आल्यास थोडा वेळ आराम करावा.
शरीर झाकतील इतके कपडे घाला.
थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य व गरम कपडे घालावेत. हात, पाय, कान व डोकं पूर्ण झाकणारे कपडे घातल्यास थंडीचा त्रास होत नाही.