पुणे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी बृहन्मुंबई येथे पश्चिमत प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पुणे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृह विभागाने आज राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
संदीप कर्णिक हे पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक होते. त्यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ ला क्रांतिदिनी मावळ बंद पुकारण्यात आला होता. तेव्हा मुंबई-पुणे महामार्गावर बऊर येथे शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने एकत्र होऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संदीप कर्णिक यांची बदली देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता संदीप कर्णिक यांची पुणे सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.