भारतीय क्रिकेटसंघामध्ये टी 20 वर्ल्ड कपनंतर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट होऊ शकतात. यामध्ये गोलंदाजी कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर श्रीधर आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड यांचा समावेश असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे स्वत: रवी शास्त्री यांनी आपण टी 20 वर्ल्डकपनंतर प्रशिक्षकपदी न राहण्याचा विचार करत असल्याचं BCCI च्या काही सदस्यांना कळवलं आहे.
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांच्यासोबत BCCI पुन्हा करार करण्याची शक्यता कमी आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, BCCI सुद्धा आता नव्या स्टाफच्या विचारात आहे. रवी शास्त्री यांनी यापूर्वी 2014 आणि 2016 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर अनिल कुंबळे हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे पूर्णवेळ प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली. 2017 पासून रवी शास्त्री भारतीय संघाचे कोच म्हणून काम पाहात आहेत.
भारतीय गोलंदाजीला धार
भरत अरुण यांनी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहताना, भारतीय गोलंदाजीला धार चढवली. गेल्या काही काळात भारतीय गोलंदाजी जगातील अव्वल गोलंदाजीमध्ये गणली जाऊ लागली. याशिवाय आर श्रीधर यांनी प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी केली.
रवी शास्त्रींच्या कार्यकाळात ICC जेतेपद नाहीच
दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडिया 2019 वर्ल्डकप सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाली. आतापर्यंत रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकली नाही.
परदेशात जबरदस्त कामगिरी
भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकला नसला तर रवी शास्त्रींच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केलं. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमध्ये जाऊन जबरदस्त कामगिरी केली.
याशिवाय भारतात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या बलाढ्य संघांवर मात दिली. याशिवाय गेल्या काही दिवसात भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथही सुधारली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2-1 ने विजय मिळवून देण्यात बेंच स्ट्रेंथचा मोठा वाटा होता.