सहा फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज सुरु होणार आहे. सीरीज सुरु होण्याआधीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनी आणि श्रेयस अय्यर यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे खेळाडू वनडे सीरीजमध्ये खेळणार की, नाही याबद्दल ठोस आताच काही सांगता येणार नाही. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येक खेळाडूला सात दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागते. त्यानंतर दोन RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीममध्ये स्थान मिळते. धवन, अय्यर आणि गायकवाडचं वनडे सीरीज खेळणं, कठीण दिसतय. मागच एक वर्ष श्रेयस अय्यरसाठी खूपच वाईट होतं. नशिबाने दगा दिल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं.
श्रेयस अय्यरला मागच्यावर्षी मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएलच कर्णधारपद गमवाव लागलं. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये जागा मिळाली नाही. त्यानंतर अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्याने शतक ठोकून आपल्यातील प्रतिभेची चुणूकही दाखवली. पण त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. आता कोविड झाल्यामुळे श्रेयसला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकावे लागू शकते.
श्रेयस अय्यरला मागच्यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याचा खांदा दुखावला होता. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. याच दरम्यान आयपीएल सुरु झालं. आयपीएलच्या पहिल्या भागात दिल्ली कॅपिटल्सकडून श्रेयस खेळू शकला नाही. अय्यरला कर्णधारपदावरुन हटवून ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले.
अय्यर आयपीएलच्या दुसऱ्या स्टेजमध्ये संघात परतला, तेव्हा त्याला कर्णधारपद दिलं नाही. ऋषभ पंत कर्णधारपदी कायम होता. दिल्लीने श्रेयसला रिटेनही केलं नाही. दुखापतीआधी दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयसला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं नाही. अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवची निवड झाली. पण अय्यरने हार मानली नाही. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं