भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच निकाल दिला आहे. तरीही, या प्रश्नावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणार असून, त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित केले जाईल़ या बैठकीनंतर भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
भोंगे वापराबाबत दोन दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये निकाल दिला होता. त्यानंतर २०१५ आणि २०१७ मध्ये सरकारचे काही आदेश निघाले आहेत. त्यात भोंगे, ध्वनिक्षेपकाच्या परवानगीची पद्धत ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र, भोंग्यांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा करणार आहे. राज ठाकरेंनाही या बैठकीला बोलावणार आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
भोंगे लावणे किंवा हटविणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत. ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना भोंगे लावता येणार नाहीत, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. भोंग्यांबाबत पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल दिला आहे, असेही त्यांनी सांगितल़े
गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वळसे पाटील यांनी केल़े संघर्ष वाढविण्याचा किंवा तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.