विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला 50 खेके म्हणत वारंवार डिवचले जात आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांचे खोके बाहेर काढू असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. ते ‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांचे खोके बाहेर काढू असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच विरोधकांना कामातून उत्तर देणार असल्याचही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर टीका करण्यात आली होती, या टीकेचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला आहे. आमदारांचं खच्चीकरण सुरू होतं, त्यामुळे हे सर्व आमदार आज माझ्यासोबत आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सध्या महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच तापला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. बेळगावातल्या मराठी माणसाशी नाळ जोडलेली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात आंदोलन केल्यानं मी स्वत: तुरुंगात होतो. बेळगावच्या मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत माझी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ज्योतिषाला हात दाखवायची गरज नाही
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपलं भविष्य पहाण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला ज्योतिषाला हात दाखवायच गरज नाही. ज्यांना दाखवायचा त्यांना मी चार महिन्यांपूर्वीच हात दाखवल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.