सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणाई ही सोशल मीडियावर आहे. तसेच यूट्यूबसारख्या डिजिटल माध्यमाचा प्रचंड वापर होताना दिसत आहे. याच यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील तरुणीने बाजी मारली आहे.
अपर्णा तांदळे असे या तरुणीचे नाव आहे. यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या टॉप क्रिएटर्सच्या यादीत कामवाली बाई हे कॅरेक्टर असलेले शॉर्ट ब्रेक्स चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. यात अपर्णा तांदळेच्या कामवाली बाईचा ‘बारिश में भीगना’ हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल 30 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अपर्णा तांदळे ही पुण्याची आहे. अपर्णा तांदळे हिचं वय केवळ 22 वर्षे आहे. मात्र, इतक्या कमी वयातही ती सध्या ती यूट्यूबसह सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
अपर्णा तांदळे ही मूळची पुण्यातील हडपसरमधील आहे. तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तीन बहिणी आणि आई-वडील असा तिचा परिवार आहे. तिला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकांमध्ये सहभाग घेतला. तिचं शालेय शिक्षण पुण्यातील कॅम्प एज्युकेशन कन्या शाळेत झाले आहे. तर महाविद्यालयाचं शिक्षण हुजूरपागा महाविद्यालय आणि गरवारे कॉलेजमधून झाले आहे.
अपर्णाला अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. नंतरच्या काळात शॉर्ट्स ब्रेक या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तिने ‘कामवाली बाई’ शीला दीदीचे व्हिडीओ बनवायला सुरू केले. अपर्णाच्या कल्पनेतून हे भन्नाट व्हिडिओ आले. हे व्हिडीओ सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
शीला दीदी या ‘कामवाली बाई’ची भूमिका करणाऱ्या अपर्णा तांदळेने सध्या इंस्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. अपर्णा तांदळे हे नाव सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे, कारण तिच्या प्रत्येक व्हिडीओवर मिलियन्स व्ह्युज आणि लाखोंच्या संख्येने लाईक्स असतात.
SHORTS BREAK या यूटयूब चॅनेलवर अपर्णा ही शीला दीदीच्या रुपात आणि तिचे मित्र सायली सोनुले आणि प्रशांत कुलकर्णी मालकाच्या रुपात वेगवेगळे व्हिडीओ बनवतात. हे व्हिडिओ सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतात. त्यामुळे त्या व्हिडिओंना चांगली पसंती मिळते आहे.