युक्रेनवर हल्ला करण्याची
रशियाची तयारी
युक्रेनच्या ( Ukraine ) सीमेवर रशियाने (Russia) मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. विशेष म्हणजे युक्रेनच्या सीमेजवळच्या विमानतळांवर रशियाने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांसह आवश्यक वायुदल तैनात केलं आहे. युक्रेन जवळच्या काळ्या समुद्रात आणि अझोव्ह समुद्रात रशियाने युद्धनौकाही तैनात केल्या आहेत. थोडक्यात छोटेखानी युक्रेनवर हल्ला करण्याची पुर्ण तयारी रशियाने केली आहे. चर्चेची शक्यता राहीली नसल्याने प्रत्यक्ष युद्धाला कधीही सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लालू यादव यांची पुन्हा जेलमध्ये
रवानगी होण्याची शक्यता
चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव जामीनावर बाहेर होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना डोरांड कोषागारातून १३९ कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर लावण्यात आला होता. १९९६ साली घडलेल्या प्रकरणात लालू यादव मुख्य आरोपी होते. त्यांना दोषी ठरवल्याचा निर्णय रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे
तालिबानच्या विशेष लष्करी
पथकाला ‘पानिपत’ दिले नाव
अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या तालिबानच्या हंगामी सरकारने स्थापन केलेल्या विशेष लष्करी पथकाला ‘पानिपत’ असं नाव दिलं आहे. अहमद शाह दुर्राणीच्या नेतृत्वाखाली १७६१ साली झालेल्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केलेल्या अफगाणी फौजांकडून प्रेरणा घेण्याच्या हेतूने हे नाव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या माध्यमातून तालिबानने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावरुनही तालिबानने केलेल्या या नामकरणावरुन टीकेची झोड उठवण्यात आलीय.
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
अश्विनी कुमार यांची सोडचिठ्ठी
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि यूपीए सरकारमधील मंत्री राहिलेले अश्विनी कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अश्विनी कुमार यांनी आपला राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. अश्विनी कुमार यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कायदा मंत्री देखील होते. ते जवळपास आठ महिने देशाचे कायदा मंत्री राहिलेले आहेत.
भाजपाला आव्हान, बघू कोणात
किती दम आहे : संजय राऊत
पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असंही ते काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यामुळे हे भाजपाचे साडेतीन लोक कोण? संजय राऊत नक्की कोणते खुलासे करणार ? याकडे सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने भाजपा शिवसेना आणि ठाकरे परिवारावर चिखलफेक करत असून पक्ष म्हणून त्याला उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
माती वाहून जाण्याच्या प्रमाणात
१० ते १५ टक्क्यांनी वाढ
गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्याच्या विशेषत: दुष्काळी नगर, पाथर्डी, शेवगावमधील काही गावांत ढगफुटी झाली. त्याच वेळी जिल्ह्यातील ९६ पैकी २० मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. ही १९३ गावे दुष्काळी पट्टय़ातील आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्याला असाच अनुभव मिळतो आहे. पर्जन्यगुणांकात किमान २५ टक्के वाढ झाल्याने माती वाहून जाण्याच्या प्रमाणात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आढळते. त्यातूनच जलसंधारणाच्या कामांमध्ये बदल करण्याची आवश्यकता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
तृतीयपंथीयांना आरक्षण द्या,
राजस्थान सरकारला आदेश
सरकारी नोकरीमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायलयानं देऊन देखील हे आरक्षण नाकारणाऱ्या राजस्थान सरकारला राजस्थान उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. न्यायमूर्ती मदन गोपाल व्यास आणि न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी यासंदर्भात राजस्थान सरकारला आदेश दिले असून तृतीयपंथीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास बजावले आहे. यासंदर्भात राजस्थान सरकारकडून आरक्षण लागू करण्यास नकार देण्यात आला होता.
ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी
३७ लाख खर्च करावे लागतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर त्याच्या कमाईमुळे चर्चेत आहे. अध्यक्षपद सोडल्यानंतरही ते वैयक्तिकरित्या लाखो डॉलर्स कमवत आहेत. रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फोटो काढण्यासाठी, चहा घेण्यासाठी त्यांच्या खिशातून हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर फोटो काढण्यासाठी २२ लाख रुपये लागतात.
संपकरी एसटी कामगारांची
बडतर्फी केली जाणार
एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई अटळ असल्याचे संकेत मिळत आहे. संपकरी एसटी कामगारांची आजपासून बडतर्फी केली जाणार आहे. त्यामुळे कायमचे घरीच बसावे लागणार आहे.
कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात
4 जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये कोरोनाचे मृत्यू सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तेरा फेब्रुवारीच्या अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत दोन आणि ग्रामीण भागात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 64 हजार 252 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
SD social media
9850 6035 90