आज दि.३१ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले
सर्वात शक्तिशाली भारतीय!

इंडियन एक्सप्रेसकडून जाहीर करण्यात येणाऱ्या २०२२ मधल्या १०० शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येला करोना काळात नियमांचं पालन करण्यास भाग पाडण्यापासून, करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विक्रमापर्यंत नरेंद्र मोदींनी देशातल्या राजकारणावर विविध मुद्द्यांच्या आधारे राज्य केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ९ व्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे
सर्व नियम हटवले

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व नियम हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूक जोरात काढा असे आदेश आहेत.

आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा
निर्णय रद्द होण्याची शक्यता

आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. घरांबाबतचा निर्णय कदाचित रद्द केला जाईल, असे अजित पवार म्हणालेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना 300 घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता.

उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करा : मागणी

एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिलेले असताना अजित पवारांनी ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं निदर्शनास आणत एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. त्यातच आज आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला चक्कर आल्यानंतर तिथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. अजित पवारांच्या इशाऱ्यामुळे या व्यक्तीने धसका घेतल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचा दावा करत त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी बोलताना केली.

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च
फाउंडेशनवर पाच वर्षांसाठी बंदी

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही बेकायदेशीर संघटना असल्याचे घोषित केले आणि या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी देखील घातली आहे. ”आयआरएफचा संस्थापक झाकीर नाईकची भाषणं आक्षेपार्ह आहेत, तो दहशतवाद्यांची स्तुती करतो आणि प्रत्येक मुस्लीम दहशतवादी असला पाहिजे.” असं म्हणत असल्याचं गृहमंत्रालयाने अधिसूचनेद्वारे सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमके कधी
मुख्यमंत्री होणार? : गणेश नाईक

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील कलगीतुरा अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये. भाजपाकडून याआधी अनेकदा महाविकास आघाडीचं सरकार पडण्याविषयी विधानं केली जात होती. आता नवी मुंबईतील भाजपा आमदार गणेश नाईक यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस नेमके कधी मुख्यमंत्री होणार? याचाच मुहूर्त जाहीर करून टाकला आहे.
नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गणेश नाईक, देवेंद्र फडणवीस आणि मंदा म्हात्रे एकाच व्यासपीठावर आले होते. गणेश नाईक यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली. “महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल, तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. अजिबात राजकारण आणलं नाही”.

अविवाहित मुलगी पालकांकडे
लग्नाचा खर्च मागू शकते

अविवाहित मुलगी आपल्या पालकांकडे लग्नाचा खर्च मागू शकते, असा निर्णय छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला आहे. यावेळी छत्तीसगड उच्च न्यायालयाने निर्णय देताना हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, १९५६ च्या तरतुदीचा संदर्भ दिला आहे. या कायद्यानुसार अविवाहित मुलगी तिच्या पालकांकडून लग्नाच्या खर्चाचा दावा करू शकते. कोर्टाने हा निकाल देताना दुर्ग कौटुंबिक न्यायालयाचा आदेशही फेटाळला आहे. दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी राजेश्वरी या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला

दारू पिणारे महापापी : नीतीशकुमार

महात्मा गांधींनीही दारू पिण्यास विरोध केला होता आणि जे त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात जातात ते ‘महापापी आणि महायोग’ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी या लोकांना भारतीय मानत नाही. दारू पिणे हानिकारक आहे हे माहीत असूनही हे लोक दारुचे सेवन करतात आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना ते जबाबदार आहेत, राज्य सरकार नाही. चूक त्यांची आहे. दारू विषारी असते हे माहित असूनही ते दारुचं सेवन करतात, असंही ते म्हणाले.

14 वर्षीय मुलाचा समुद्रात सलग 57 किलोमीटर पोहण्याचा विक्रम! भारत ते श्रीलंका अंतर पोहत जाऊन आला परत

थेनी येथील 14 वर्षांच्या एन. ए. स्नेहन या मुलानं भारताच्या टोकापासून पोहत निघून श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याचा आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघून तितकंच अंतर पोहण्याचा विक्रम केला आहे. त्यानं तामिळनाडूतील धनुष्कोडी ते श्रीलंकेतील थलाईमन्नारपर्यंतचं अंतर जाताना आणि परत येताना पोहून पार केलं. यासह त्यानं 57 किलोमीटर सलग समुद्रात पोहून जाण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. हे अंतर पोहण्यासाठी त्याला 19 तास 45 मिनिटं लागली. स्नेहनच्या या विक्रमाची यूआरएफ वर्ल्ड रेकॉर्डच्या बुकमध्ये नोंद झाली आहे.

इम्रान खानची नवी चाल, पराभव निश्चित पाहून विरोधकांसमोर संसद बरखास्त करण्याचा प्रस्ताव

पाकिस्तानवर राजकीय संकट घोंघावत आहे. चारही बाजूंनी वेढलं गेलेलं पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता नवी चाल खेळली आहे. त्यांनी संसद बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. असं करून त्यांना अविश्वासाचा ठराव टाळायचा आहे. विरोधकांना फ्लोअर टेस्ट हवी असली तरी सरकार स्थापनेसाठी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. मात्र, इम्रान खान यांनी नवी खेळी करून परिस्थिती आणखीनच गडद केली आहे. काही वेळातच पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.