मागच्या कित्येक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे कोणत्याकोणत्या कारणावरून आंदोलन सुरू असते. दरम्यान मागच्या वर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन करत विविध मागण्या मान्य करून घेत एसटी आंदोलन स्थगित केले. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या.
राज्याचे परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीए देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मागच्या दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत महागाई भत्ता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान पुढच्या काळात सणासुदीचा काळ आणि वाढच्या महागाईला एसटी कर्मचाऱ्यांना हातभार लागणार आहे.
मागच्या वर्षी दिवाळीमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला होता. एसटी विलिनीकरणासह अन्य मागण्या एसटी कामगार संघटनांनी केली होती. महाविकास आघाडीच्या काळात एसटीच्या संपाबाबत महत्वाचे निर्णय घेत तोडगा काढण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासोबत त्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली नव्हती. याचबरोबर संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली गेली होती.
दरम्यान, आता काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. महागाई भत्ता देण्यात यावा, हजारो एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केले जावे, यांसोबतच वेगवेगळ्या मागण्यांवर लक्ष वेधण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.