खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

देशात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात  तब्बल ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात ८ वाघांचा मृत्यू हा महाराष्ट्रात झाला असून ६ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. वाघाचे वाढते मृत्यू चिंतानजक असल्याने यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे.

देशात दरवर्षी शेकडो वाघाचा मृत्यू होत आहे. २०२३ च्या दोन महिन्यात तब्बल ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशामध्ये वाघाचे सर्वाधिक मृत्यू झाले असून त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे सर्वाधिक मृत्यू आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाव्दारे दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. जगात सर्वाधिक वाघ भारतात असून त्यांची संख्या  २ हजार ९६७  इतकी आहे. त्यापाठोपाठ रशिया ४३३, डंडोनेशिया ३७१, नेपाल ३५५, थाइलॅंड १४९, मलेशिया १२०, बांग्लादेश १०६, भूटान १०३, चीन ५५, म्यानमार २२ वाघ आहे.

वाघ हा अन्नसाखळीतील अतिशय महत्वाचा प्राणी आहे. त्यांचे योग्य संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार वनविभाग योजना आखतात. मात्र, वाघाचे मृत्यू थांबविण्यात अद्यापही वनविभागाला यश आले नाही.

 २०१२ पासून वाघाच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. देशात २०१२ मध्ये ८८ वाघांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये ६८, २०१४ मध्ये ७८, २०१५ मध्ये ८२, २०१६ मध्ये १२१, २०१७ मध्ये ११७, २०१८ मध्ये १०१, २०१९ मध्ये ९६, २०२० मध्ये १०६, २०२१ मध्ये १२७, २०२२ मध्ये १२१ तर २०२३ मधील जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघाचे मृत्यूचे कारण हे विषबाधा, विद्युत धक्क्याने मृत्यू, वाघाची शिकार, वाघाची आपसी लढाई असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाघाचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करून वाघाचे मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.

३ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तालुक्यात एका शेतातील विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. ४ जानेवारीला सावली रेंजमधून सुटका करण्यात आलेल्या वाघिणीचा १४ जानेवारीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर शेतात विजेचा धक्का लागून १४ जानेवारीच्या रात्री भद्रावती रेंजअंतर्गत माजरी येथे, तर ५ फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा रेंजमधील घोसरी बीट अंतर्गत शेतात एका वाघाचा मृत्यू झाला होता. यानंतर पूर्ण वाढ झालेल्या एका वाघाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. १२ फेब्रुवारी रोजी वरोरा रेंजच्या सीमेवरील पोथरा नदीत वाघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. २६ फेब्रुवारील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील कक्ष क्रमांक २७८ मध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृत्यू झाला.दोन महिन्यांच्या कालावधीत सहा वाघांचा मृत्यू वन खात्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.