दोन वर्षांच्या खंडानंतर प्रचंड उत्साहात रविवारी संपन्न झालेल्या १८व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या ‘एलिट’ गटात पुरुषांमध्ये हायले लेमी (२ तास ७ मिनिटे ३२ सेकंद) आणि महिलांमध्ये अंचलेम हेमानोत (२ तास २४ मिनिटे १५ सेकंद) या इथिओपियाच्या धावपटूंनी विक्रमी वेळेसह जेतेपद पटकावले. यासह त्यांनी ४५ हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस (साधारण ३६ लाख ५८ हजार रुपये) आणि १५ हजार अमेरिकी डॉलर (साधारण १२ लाख १९ हजार रुपये) बोनसच्या रूपात आपल्या नावे केले. कडाक्याच्या थंडीतही ‘हर दिल मुंबई’चा नारा देत ५५ हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.
‘एलिट’ गटात भारतीयांमध्ये पुरुष विभागात ऑलिम्पिकपटू आणि २०१७च्या आशियाई अजिंक्यपद मॅरेथॉनचा विजेता गोपी थोनाक्कलने बाजी मारली. गोपीने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास १६ मिनिटे आणि ४१ सेकंदांत पूर्ण केले. सेनादलच्या मान सिंह (२ तास १६ मिनिटे ५८ सेकंद) आणि साताऱ्याच्या कालिदास हिरवे (२ तास १९ मिनिटे ५४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. महिलांमध्ये पदार्पणवीर छवी यादव (२ तास ५० मिनिटे ३५ सेकंद) विजेती ठरली. आरती पाटीलला (३ मिनिटे ४४ सेकंद) दुसरे आणि रेणू सिंहला (३ तास १ मिनिट ११ सेकंद) तिसरे स्थान मिळवण्यात यश आले.
रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनच्या १८व्या पर्वातील ‘एलिट’ गटात आफ्रिकी देश इथिओपियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुषांमध्ये अव्वल दहापैकी पाच, तर महिलांमध्ये अव्वल दहापैकी नऊ क्रमांक इथिओपियाच्या धावपटूंनी पटकावले. २०१६च्या बॉस्टन मॅरेथॉनच्या विजेत्या लेमीने विक्रमी वेळेसह पुरुषांमध्ये बाजी मारली. त्याने गेल्या (२०२०) मॅरेथॉनमधील विजेत्या इथिओपियाच्याच देरेरा हुरिसाचा २ तास ८ मिनिटे आणि ९ सेकंद अशा वेळेचा विक्रम मोडीत काढला. केनियाच्या फिलेमॉन रोनो (२ तास ८ मिनिटे आणि ४४ सेकंद) आणि इथिओपियाच्या हायलू झेवदू (२ तास १० मिनिटे २३ सेकंद) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्या ३० किलोमीटरमध्ये या तिघांत केवळ ९ सेकंदांचे अंतर होते, मात्र त्यानंतर लेमीने आपली गती वाढवली आणि एक मिनिटाहून अधिकच्या अंतराने जेतेपदावर मोहोर उमटवली.