जगभरात आंतरजाळाचा (इंटरनेट) वापर करताना हवे ते शोधण्याचे माध्यम (सर्च इंजिन) मानल्या जाणाऱ्या ‘गूगल’ने रविवारी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करत खास ‘डूडल’ तयार करून त्यांना आगळी मानवंदना दिली.
स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची रविवारी ९७वी जयंती होती. ऑलिम्पिक पदक मिळवल्यापासून आजपर्यंत खाशाबा आणि त्यांची कामगिरी कायमच दुर्लक्षित राहिली. अशा वेळी जगभरात शोध माध्यमात अग्रस्थानी असलेल्या ‘गूगल’ने त्यांची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त खास ‘डूडल’ची निर्मिती केली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खाशाबांनी आपली कारकीर्द घडवली. वडिलांकडून वयाच्या दहाव्या वर्षी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केल्यावर खाशाबांनी स्वत:ला असे काही घडवले की त्यांच्या कामगिरीचा डंका सर्वदूर पोहोचला. ऑलिम्पिकचे दरवाजे त्यांना सहज उघडले गेले. सर्वप्रथम १९४८ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला. मात्र, तेव्हा त्यांना गादीवर (मॅट) खेळायची सवय नसल्याने त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ते स्थानही भारतीयांसाठी सर्वोत्तम होते. खाशाबांचे कौतुक झाले, पण ते स्वत: नाराज होते. पुढील चार वर्षांत त्यांनी वजन गट वाढवून कठोर मेहनत घेतली आणि १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले.