दहशतवाद्यांकडून आणखी एका 19 वर्षीय युवकाची गोळी झाडून हत्या
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव असून तो बिहारचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा जिल्ह्यातील अजस तहसीलमधील सदुनारा गावात ही घटना घडली. अमरेज हा मधेपुरा जिल्ह्यातील बेसड गावचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचं नाव मोहम्मद जलील असल्याचं सांगण्यात येत आहे. अमरेज येथे तो कामासाठी आला होता. त्याच्याबद्दल इतर माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.
दहशतवाद्यांकडून खोऱ्यात गैर-काश्मीरी लोकांच्या हत्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. एप्रिलमध्ये दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी सतीश सिंग राजपूत नावाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. काश्मीर घाटीमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांनी स्थानिक नसलेल्या लोकांना इथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेज अंतर्गत खोऱ्यात तैनात असलेल्या काश्मिरी पंडित समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे.